कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात भुरट्या गुंडांचा उच्छाद सुरु असतानाच आता थेट दमदाटी, मारामारी, खंडणी, अवैध शस्त्र बाळगण्याच्या गुन्ह्यांमध्ये मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या आरोपीला थेट दुग्धाभिषेक घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
आरोपी अनिकेत अमर सूर्यवंशी (वय 21, रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) हा मोक्कातील आरोपी असून त्याच्यावर दमदाटी, मारामारी, खंडणी, अवैध शस्त्र बाळगण्याच्या गुन्ह्यात कारवाई झाली आहे. 2021 पासून त्याची रवानगी कळंबा जेलमध्ये करण्यात आली होती.
-
पोलिसांकडून चौघांना अटक, रिल व्हायरल होताच कारवाई
अनिकेतची 24 डिसेंबरला जेलमधून सुटका झाली होती. यानंतर त्याच्या स्वागताला अगदी पाठिराख्यांपासून ते नातेवाईक सुद्धा हजर होते. जेलपासून त्याच्या घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी दारात रांगोळी काढून खूर्चीवर दुग्धाभिषेकही करण्यात आला. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी कारवाई केली असून चौघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी एक कार आणि दोन दुचाकी सुद्धा जप्त केल्या आहेत.
-
टोळीची दहशत पुन्हा बसवण्यासाठी हा प्रकार
पोलिसांनी अनिकेत अमर सूर्यवंशी, गब्बर उर्फ आदित्य अमर सूर्यवंशी, अनुराग दिलीप राखपसारे, करण उर्फ तुषार सिद्धू कुमठे, सागर कैलास गौडदाब, प्रथमेश कुमार समुद्रे आणि वेदांग शिवराज पोवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गब्बरल सोडून इतराच्या पोलिसांनी पुन्हा मुसक्या आवळल्या आहेत. टोळीची दहशत पुन्हा बसवण्यासाठी हा प्रकार केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
-
दारात मंडप, रांगोळी स्वागताला नातेवाईक सुद्धा सामील
आरोपी अनिकेतची सुटका झाल्यानंतर त्याची कळंबा जेल पासून ते घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. स्वागतासाठी दारात मंडपही घालण्यात आला होता. रांगोळी सुद्धा काढण्यात आली होती. यानंतर दारात पोहोचताच त्याचे औक्षण सुद्धा करण्यात आले. इतक्यावर न थांबता दुग्धाभिषेकही करण्यात आला. हा सर्व प्रकार 24 डिसेंबर रोजी घडल्यानंतर सोमवारी सकाळी व्हिडिओ व्हायर झाल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. रिल व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली. व्हिडिओ डीलीट करण्यात आला.