बीड प्रतिनिधी – गोपनीय खबऱ्या | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि अवादा कंपनीकडे केलेली खंडणीची मागणी याचा सध्या सीआयडी तपास करत आहेत. या प्रकरणात वाल्मिक कराड हा अटकेत आहेत. तर त्याचवेळी गुन्ह्यातील आरोपी विष्णू चाटे यांने दिलेल्या एका कबुलीमुळे वाल्मिक कराड हा आणखी गोत्यात आला आहे.
वाल्मिक कराडच्या कोठडीसाठी CID जी रिमांड कॉपी सादर केली होती. ती आता ‘गोपनीय खबऱ्या‘च्या हाती लागली आहे. ज्यामध्ये विष्णू चाटेने वाल्मिक कराडबाबत दिलेल्या कबुलीचा उल्लेख आहे.
विष्णू चाटे याच्या मोबाइलवरून वाल्मिक कराड याने धमकी दिली होती आणि त्याने 2 कोटींच्या खंडणीची मागणी केली असल्याचा आरोप अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांने पोलीस तक्रारीत केला आहे. तर त्याचवेळी विष्णू चाटे यानेही आपल्या कबुली जबाबत असं म्हटलं आहे की, वाल्मिक कराड यांना फोन लावून अवादा कंपनीचे शिंदे यांचेशी बोलणे करुन दिले.
- विष्णू चाटेने दिली कबुली, CID ची रिमांड कॉपी जशीच्या तशी…
उपरोक्त विषयान्वये सविनय सादर कि. यातील फिर्यादी नामे सुनिल केदु शिंदे वय ४२ वर्ष व्यवसाय खाजगी नोकरी, रा. बीड यांनी दिनांक ११.१२.२०२४ रोजी पोलीस ठाणे केज येथे हजर येऊन तोंडी सांगून फिर्याद दिली की, मी वरील ठिकाणचा राहणार असून मागील 1 वर्षापासून अवादा एनर्जी प्राव्हेट लिमीटेड कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत आहे.
माझ्याकडे बीड जिल्हयातील केज तालुक्यातील विविध ठिकाणी पवन उर्जा प्रकल्पाचं मांडणी व उभारणीचे काम आहे. मस्साजोग या ठिकाणी प्रकल्पाचे मुख्य कार्यालय असून त्या ठिकाणी माझे सोबत विविध प्रकल्पाचे अधिकारी काम पाहत आहेत. माझे सहकारी शिवाजी नाना थोपटे हे जमीन अधिग्रहण विभागाचे काम पाहतात. आमचे पवन उर्जा प्रकल्पाचे प्रमुख म्हणून श्री. सतिश कुमार हे महाराष्ट्रात काम पाहतात.
दिनांक २९.११.२०२४ रोजी १०.०० वा. सुमारास मी मस्साजोग येथील अवादा एनर्जी प्रकल्पाचे कार्यालयात हजर असतांना माझे मोबाइल क्रमांक —– वर विष्णू चाटे यांचा मोबाइल क्रमांक —— वरुन फोन आला व त्यांनी मला वाल्मिक अण्णा बोलणार आहेत असे म्हणाले, ‘आरे काम बंद करा. ज्या परिस्थिती मध्ये सुदर्शनने सांगितले आहे, त्या परिस्थीतीत काम बंद करा, अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील, काम चालू केले तर याद राखा..’ असे म्हणून प्रकल्पाचे काम बंद करणेबाबत धमकी दिली.
मी व शिवाजी थोपटे असे कार्यालयात हजर असतांना दुपारी 2.30 वाजण्याचे सुमारास सुदर्शन घुले रा. टाकळी हा आमचे मस्साजोग येथील प्रकल्पाचे ठिकाणी आला व त्यांनी पुन्हा काम बंद करा, अन्यथा जी मागणी यापूर्वी केलेली आहे त्याची पूर्तता करा असे म्हणून केजमध्ये चालू असलेल्या इतर ठिकाणाचे अवादा कंपनीचे सर्व काम बंद करा, अन्यथा तुमचे हात पाय तोडून तुमची कायमची वाट लावून टाकील. असे म्हणून धमकी दिली होती.
काही दिवसापुर्वी शिवाजी थोपटे यांना वाल्मिक अण्णा कराड यांनी त्यांचे परळी येथील कार्यालयात बोलावून अवादा कंपनीचे केज तालुक्यातील सर्व काम बंद करा अन्यथा काम चालू ठेवायचे असेल तर 2 करोड रुपये द्या. असे सांगितले होते. त्यानंतर वेळोवेळी विविध लोकांचे मोबाइलवरुन प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या प्रकल्पाचे काम बंद न ठेवल्यास मारहाण करण्याच्या व जीवे मारण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत.
यापूर्वी दिनांक २८.०५.२०२४ रोजी ११.०० वाजण्याचे सुमारास याच कारणावरुन माझे अपहरण केलेले होते. त्याबाबत मी पोलीस ठाणे केज येथे तक्रार दिली होती. त्यावरुन पोलीस ठाणे केज गुरनं २८५ / २०२४ गुन्हा दाखल आहे. तसेच दिनांक ०६.१२.२०२४ रोजी देखील सुदर्शन घुले व इतर यांनी अवादा कंपनीचे मस्साजोग येथील प्रकल्पाचे ठिकाणी जबरदस्तीने प्रवेश करुन गेटवरील कामगारांना धमकी देऊन मारहाण केली होती. त्यावेळी आमचे कंपनीचे शिवाजी थोपटे यांनी सुदर्शन घुले व इतर लोकांविरूध्द पोलीस ठाणे केज येथे तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झालेला आहे.
तरी मी काम करत असलेल्या अवादा कपंनीचे केज तालुक्यातील पवन उर्जा प्रकल्पाचे काम बंद करण्यासाठी वाल्मिक कराड रा. परळी व सुदर्शन घुले रा. टाकळी ता. केज हे वारंवार प्रकल्पाचे काम चालू झाल्यापासून धमकी देत आहेत. त्यामुळे मी त्यांचे दहशतीखाली असल्याने व माझी मनस्थिती बरोबर नसल्याने मी आमचे कंपनीचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्याशी चर्चा करुन त्यांचे सल्ल्याने आज रोजी उशिराने तक्रार देत आहे.
मजकुराचे फिर्यादवरुन वरील विषयाप्रमाणे गुन्हा नोंद झाला असुन प्रथम पुढील तपास सपोनि एस. एस. बनसोडे पो.स्टे केज यांनीकेला आहे. तद्नंतर श्री कमलेश मीणा, सहा. पोलीस अधीक्षक, उप विभाग केज यांनी केला. त्यानंतर सदर गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करणेबाबत आदेशीत केल्याने सदर गुन्ह्याची मूळ कागदपत्रे सहा. पोलीस अधीक्षक, उप विभाग केज यांचेकडून प्राप्त करुन गुन्ह्याचा पुढील तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत आम्ही स्वतः करीत आहोत…
सदर गुन्ह्यातील आरोपी हे गुन्हा घडल्यापासून मिळून आलेले नसल्याने ते सदर गुन्ह्यात पाहिजे आरोपी होते. वेळोवेळी आरोपींचा ठिकठिकाणी शोध घेतला असता ते मिळून येत नव्हते. तपासा दरम्यान आरोपींचा शोध घेत असतांना आरोपी नामे विष्णु महादेव चाटे (वय ४७ वर्षे) व्यवसाय गुत्तेदारी रा. कवडगाव ता. केज हा दिनांक १८.१२.२०२४ रोजी स्था.गु.शा बीडचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना बीड ते छ. संभाजीनगर रोडवर गुरुकुल पब्लिक स्कूलजवळ बीड येथे मिळून आला आहे.
नमूद आरोपीस सदर गुन्ह्यात दिनांक १८.१२.२०२४ रोजी १७.०४ वाजता अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यात मा. न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने ०९ दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली होती. त्यानंतर विष्णु चाटे याला दिनांक २७/१२/ २०२४ रोजी मा. न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने दि. ०६/०१/२०२४ रोजी पर्यंत ११ दिवस पोलीस कोठडी मंजूर केलेली आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक बाबुराव कराड हा गुन्हा घडल्यापासून मिळुन आलेले नसल्याने ते सदर गुन्ह्यात पाहिजे आरोपी होते. वेळोवेळी आरोपींचा ठिकठिकाणी शोध घेतला असता ते मिळून येत नव्हते. तपासा दरम्यान आरोपी नामे वाल्मिक बाबूराव कराड (वय – ५४ वर्ष) रा. परळी जि. बीड यांना भारतीय नागरीकसुरक्षा संहिता- २०२३ चे कलम ३५(३)(१) प्रमाणे नोटीस देऊन बोलाविले असता ते राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे तपासाकामी बोलाविले असता त्यांचेकडे विचारपूस करण्यात आली.
त्यांचा सदर गुन्ह्यात सहभाग असल्याची आम्हास खात्री झाल्याने नमूद आरोपीस सदर गुन्ह्यात दिनांक ३१.१२.२०२४ रोजी २२.१७ वाजता अटक करण्यात आली आहे. अटक करण्यापुर्वी त्यांची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली असून त्यांचे अटकेबाबत त्यांना व त्यांचे नातेवाईक श्री. रोहित विष्णू कांबळे, रा. मोहा ता. परळी जि. बीड यांना माहिती दिलेली आहे.
- गुन्हयातील अटक आरोपी वाल्मिक बाबूराव कराड यांची खालील मुद्यांवर पोलीस कोठडी मंजूर होऊन मिळणेस विनंती आहे.
१) सदरचा गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा असुन गुन्हयाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (CID) करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत.
२) सदर गुन्हयातील इतर एक पाहिजे आरोपी नामे सुदर्शन घुले याचे ठाव ठिकाणा बाबतची माहिती अटक आरोपीच देऊ शकतो.
३) अटक आरोपी विष्णु चाटे याचे मोबाइल नंबर —— यावरुन फिर्यादीस स्वतः व यातील अटक आरोपी वाल्मिक कराड यास बोलायला देऊन फिर्यादीकडे 2 कोटी रुपयाचे खंडणीची मागणी केली आहे. सदर आरोपीने अशा प्रकारे आणखी किती गुन्हे केले आहेत याबाबत आरोपीकडे सखोल तपास करणे आहे.
४) सदर गुन्हयातील आरोपी व्यतिरिक्त आणखी कोणा व्यक्तींचा सदर गुन्ह्यात सहभाग आहे काय? याबाबत तपास करणे आहे.
५) सदर गुन्हयाव्यतिरिक्त यातील आरोपी यांनी आणखी कोणत्या व्यवसायिकांना खंडणीसाठी धमकी दिली आहे किंवा कसे याबाबत विचारपूस करणे बाकी आहे.
६) यातील अटक आरोपी व फरार आरोपी यांनी कोणत्या कारणास्तव फिर्यादीस खंडणीची मागणी केली आहे याबाबत अधिक तपास करणे आहे.
७) सदर गुन्हयातील अटक आरोपी नामे विष्णु चाटे यांनी त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी दि. २९/११/२०२४ रोजी वाल्मिक कराड यांना फोन लावून अवादा कंपनीचे शिंदे यांचेशी बोलणे करुन दिल्याचे सांगत आहेत.
सदर गुन्हयातील अटक आरोपी याचा पो.स्टे. केज येथे गुरनं ६३७ / २०२४ कलम १०३(१), १४० (१), १२६(२), ११८(१), ३२४(४), ३२४ (५) १८९ (२), १९१ ( २ ), १९०, ६१ (२) बी. एन. एस प्रमाणे दाखल गुन्ह्यात सहभाग आहे किंवा कसे ? याबाबत अधिक तपास करणे आहे.
८) सदर गुन्हयातील अटक आरोपी याचा पो.स्टे. केज येथेगुरनं. ६३६/ २०२४ कलम 333, 118 (1), 115 (2), 352, 351 (2)(3), 3(5) भान्यासं 2023 कलम 3( 1 ) (r) ( s), 3 ( 2 ) (va) अजाज अप्रकाबी. एन. एस प्रमाणे दाखल गुन्ह्यात सहभाग आहे किंवा कसे? याबाबत अधिक तपास करणे आहे.
९) आरोपीचे बँक अकाऊंट बाबतची माहिती घेऊन अधिकचा तपास करणे आहे.
१०) आरोपीने अशा प्रकारे केलेल्या गुन्ह्यातून मिळावलेली मालमत्तेबाबत अधिक तपास करणे आहे.
११) आरोपीवर विविध पोस्टेस एकुण १५ गुन्हे नोंद असून आरोपी सराईत गुन्हे करण्याचे सवयीचा असल्याने त्याचे इतर साथीदार यांचा शोध घेणे आहे.
१२) आरोपी मिळून येत नव्हता त्यावेळी तो कोठे-कोठे राहिला याबाबत सखोल तपास करणे आहे.
१३) आरोपीच्या आवाजाचे नमुने घेऊन पंचनामा करणे आहे.
वरील मुद्दयावर आरोपीकडे तपास करणे असल्याने अटक आरोपी नामे वाल्मिक बाबूराव कराड ता. परळी जि. बीड यांची पंधरा (१५) दिवस पोलीस कोठडी मंजूर होणेस विनंती आहे. (सोबत खुलासा केस डायरी)