राज्यातील पोलिस ठाण्यांची निवड देशपातळीवर करण्याच्या उद्देशाने समितीच्या अहवालानुसार पाच पोलिस ठाण्यांची निवड विविध निकष आणि तपासणी आधारे करण्यात आली आहे.
इचलकरंजीतील शिवाजीनगर आणि शिरोळ पोलिस ठाणे (Shirol Police Station) राज्यातील ‘सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे २०२२’ (Best Police Station 2022) म्हणून घोषित करण्यात आली.
पोलिस महासंचालकांच्या मान्यतेने विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांनी हे २०२२ चे पुरस्कार तीन दिवसांपूर्वी जाहीर केले आहेत. यात राज्यातील आणखी तीन पोलिस ठाण्यांचा समावेश आहे.
या दोन्हीसह एकूण पाच पोलिस ठाण्यांच्या तत्कालीन पोलिस निरीक्षकांना मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह व रोख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
संवेदनशील ते सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे म्हणून राज्यात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या शिवाजीनगर पोलिस ठाण्याने आपला नावलौकिक कायम ठेवत सलग दुसऱ्या वर्षी हा सन्मान मिळविला आहे. निकोप स्पर्धा वाढावी, कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध, दोषसिद्धी यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी २०१६ पासून देशपातळीवर १० सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्यांची निवड केंद्रीय स्तरावर केली जाते. यासाठी २०२२ वर्षांतील राज्यातील पोलिस ठाण्यांची निवड देशपातळीवर करण्याच्या उद्देशाने समितीच्या अहवालानुसार पाच पोलिस ठाण्यांची निवड विविध निकष आणि तपासणी आधारे करण्यात आली आहे.
- प्रमुख निकष
ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गुन्ह्यांची नोंद, तपास
न्यायालयीन प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याची कार्यक्षमता
सुलभ सेवा, तक्रारींचे निराकरण, त्वरित प्रतिसाद
कामकाजाचा दर्जा, कामाचे व्यवस्थापन
कर्मचाऱ्यांच्या कौशल्यांचा उपयोग
गुन्हेगारी प्रतिबंध, समाजसुधारण्यासाठीचे प्रयत्न
विविध सामाजिक उपक्रम
स्वच्छता, मूलभूत सुविधा आणि तांत्रिक साधनांचा वापर
- अन्य पुरस्कारप्राप्त
देगलूर पोलिस ठाणे (नांदेड)
वीरगाव पोलिस ठाणे (छत्रपती संभाजीनगर)
भोसरी पोलिस ठाणे (पिंपरी चिंचवड)