मिरा रोड येथील शांती पार्क परिसरातील आरक्षण असलेल्या जागेवर जय श्री बाल गोपाळ मंडळ व श्री गोवर्धन नाथजी हवेली या ठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
त्यावेळी नागरिक गडबड गोंधळ करत असताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने जमाव पांगवत असताना तेथील नागरिकांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे यांच्या डोक्यात काठी मारून दुखापत करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी मिरा रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरा रोड पूर्वेच्या मौजे पेणकरपाडा, सर्व्हे क्र. 222 येथील आर. जी प्लॉट च्या जागेवरील बेकायदा असलेली जय श्री गोपाळ मंडळ व गोवर्धननाथ हवेली मंदिर या वाढीव अनधिकृत बांधकामावर महापालिकेकडून 20 डिसेंबर रोजी कारवाई करण्यात येत होती. या कारवाईसाठी महापालिकेला पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आला होता. त्यावेळी तोडक कारवाई सूरु असताना राकेश कोटीयन तसेच इतर 10 ते 15 महीला व पुरूष अशी गैरकायद्याची मंडळी जमवुन पोलीस आयुक्त यांनी निर्गमित केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करत तोडक कारवाई करत असताना या कारवाईला विरोध करुन आरडा ओरड करत घोषणाबाजी करत होते. त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये यासाठी जमाव नियंत्रणात यावा याकरीता राकेश कोटीयन याला बाजुला घेत असताना शिवागाळ करुन पोलीसांना धमकावुन पोलीसांचे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या सरकारी कामात अडथळा निर्माण करु लागला. तसेच वसन विरडीया या महीलेने पोलीसांच्या हातामधील सरकारी काठी खेचुन फिर्यादी यांच्या डोक्यात जाणीवपुर्वक मारुन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दुखापत केली.
तसेच जमावामधील भावना बगालिया, सुनिता विरडीया, जयश्री सवानी यांनी मिळुन महीला पोलीस अंमलदार लालन खोजे यांना हातास पकडुन नखांनी ओरबटून दुखापत केली आहे. त्यासाठी शासकीय कामात अडथळा आणून पोलिसांना जखमी करणार्या आरोपी राकेश कोटीयन, वसन विरडीया, भावना बगालिया, सुनिता विरडीया, जयश्री सवानी व इतर 10 ते 12 पुरूष व महीलांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास विरोध करत असताना पोलीस बंदोबस्तामध्ये असलेल्या पोलीसांना मारहाण करून दुखापत केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. म्हणून मिरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड व सहायक पोलिस आयुक्त विजय मराठे यांनी घटनास्थळी भेट देत आढावा घेतला. त्यानंतर या आरोपींना अटक करून 35 (3) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे, तर आरोपींच्या विरोधात विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण भोसले हे करत आहेत.