मिरज प्रतिनिधी | शहरातील रस्त्यांच्या बाबतीत मिरजकर नागरिक बेंबीच्या देठापासून रोज बोंबलून तक्रारी करीत आहेत. रस्त्यांच्या विकास कामात किती निधी कुठे मुरला याबाबतीत प्रश्नचिन्ह आहे. मिरजकरांचेच नशीब फुटके असेल तर मग प्रशासन आणि राज्यकर्त्यांचे नशीब फळफळणारे नक्की असेल कारण याला सर्वस्वी हेच महाशय जबाबदार आहेत.
मिरज शहरातील चक्क छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाच्या अति गुळगुळीत रस्त्याबाबतीत मिरजेत रास्तारोको, उपोषण – आंदोलन झाल्याचे आपण पाहत आलोय. परंतु, ‘ठेकेदाराच्या आयचा घो’… म्हणत रस्त्यासाठी एकवटलेले सारेच थंडावले आणि पुन्हा ठेकेदार सरड्यासारखा रंग बदलून ताटू लागला. त्याला ना प्रशासनातील अधिकाऱ्यांचा धाक, ना राज्यकर्ते – लोकप्रतिनिधी असणाऱ्यांचा धाक.. ठेकेदाराने मात्र साऱ्यांनाच कोलले.? आता निवडणूक कालावधी आहे. कारणं पोत्यात मावेनात.! पण निवडणुकीच्या कालावधी पूर्वी आपलाच मोठेपणा सांगणाऱ्या लोकप्रतिनिधी व हजारो योजनांची जाहिरात करत विविध सप्ताह राबवणाऱ्या प्रशासनाच्या काही कर्तबगार लोकसेवकांना रस्त्याबाबतीत आपण काय गोंधळ घालून ठेवलाय याची एक दिवस सुद्धा आठवण झाली नसेल का..? हा प्रश्न मिरजेतील प्रत्येक जागृत नागरिक विचारत आहे.
याच छ. शिवाजी महाराज नावाच्या रस्त्यावर ‘उजेड ‘ पाडण्यासाठी बुद्धीभेदाच्या विवंचनेत असणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांनी नागरिकांचे अपघात होण्याची मोठी स्वप्ने पाहिली आणि जाणूनबुजून रस्त्याच्या मधोमध कठडे उभारले. जणू त्यांच्या मायबापाचे पुतळेच उभा करायचे होते. आता नियोजलेले कामं पूर्ण करण्यासाठी स्वतःची सेवानिवृत्ती होईपर्यंत हे महाशय वाट पाहत आहेत. अपघाताचे प्रमाण नित्याचेच झाले आहे.
रोज अपघात पाहून नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. गोपनीय खबऱ्याने यापूर्वीही रस्त्यांची मालिका सुरु केली होती. तेव्हा त्याचा इम्पॅक्ट म्हणून रस्त्याचे काम सुरु झाले. परंतु जाणूनबुजून दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना जाग कधी येणार..? मिरजकर नागरिकांच्या मनात स्वतःची हक्काची जागा कधी बनवणार..? लोक भाड्याने आलेला आणि भाडेतत्वावर आणलेला नेता म्हणून साऱ्या पांढऱ्या कपड्यातील इसमांकडे पाहत आहेत. याकडे कृपया जाणीवपूर्वक लक्ष द्यावे आणि अपघातांची सुरु झालेली नवी मालिका थांबवावी हिच प्रामाणिक अपेक्षा..!