औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर उद्या जाहीर सभा होत आहेत. त्यासाठी राज ठाकरे पुण्यातून सकाळीच औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले.
मात्र यावेळी 30 ते 40 गाड्यांचा ताफा औरंगाबादकडे जात असताना मध्येच गाड्यांचा अपघात झाला. त्यात अपघातात सात ते आठ गाड्या एकमेकांवर आदळल्याने गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
महाराष्ट्र दिनी राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे मोठी सभा होत आहे. त्यासाठी गाड्याचा ताफा जात असताना 7 ते 8 गाड्या एकमेकांवर आदळल्या. त्यात दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेते अंकुश चौधरी यांच्या गाडीचंही नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र यात कोणतेही दुखापत झाल्याची माहिती समजत आहे. आज सकाळी पुण्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतल्यानंतर राज ठाकरे हे औरंगाबाद कडे निघाले.
औरंगाबादपासून अवघ्या 20 किलोमीटरच्या अंतरावर पुढील गाडीने अचानक ब्रेक मारला. त्यानंतर मागील गाड्या या वेगाने असल्याने पुढच्या गाड्यावर येऊन धडकल्या. यात गाड्याचं नुकसान झालं आहे. अंकुश चौधरी आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांची मर्सिडीज गाडीचं नुकसान झालं आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांचं औरंगाबाद याठिकाणी आगमन झालं आहे. त्यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी गर्दी करत राज ठाकरे यांचं स्वागत केलं आहे. त्यामुळे 1 मे रोजी राज ठाकरे सभेत नेमकं काय बोलणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

