मालगावात वारकऱ्यांना बेदम मारहाण, तिघेजण जखमी : ‘सिव्हिल’मध्ये उपचार सुरु..
मिरज प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – मिरज तालुक्यातील मालगाव रस्त्यावर लक्ष्मीनगर येथे पंढरपूरहुन आषाढी एकादशी वारी करून बेळगावकडे परत जाणाऱ्या ट्रकमधील वारकऱ्यांना किरकोळ कारणावरून बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीत जखमी झालेल्या तिघांवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतीत परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बेळगांव जिल्ह्यातील तूरमुरी या सीमा भागातील ३० वारकरी पंढरपूर वारी करून गुरुवारी (केए २२ डी ८५३५ ) यां ट्रकमधून गावी परत जात होते. परत जाताना रत्नागिरी- नागपूर महामार्गवरून मिरजेकडे जाण्याऐवजी ट्रक मालगावच्या दिशेने गेला. मालगाव रस्त्यावर लक्ष्मीनगर येथे रस्त्यात उभ्या केलेल्या पांढऱ्या रंगाच्या क्रेटा कंपनीच्या चार चाकी वाहन काढण्यावरून वारकऱ्यांचा ट्रकचालक श्रीकांत मनवाडकर वय ५५,रा. शिवाजीनगर बेळगाव यांच्यासोबत अजित शेजूळ व सुखदेव बाळासो कट्टिकर (दोघेही रा. मालगाव, ता. मिरज ) यांची वादावादी झाली. मारहाण करणाऱ्यांनी यावेळेस जमाव जमविला. ट्रक चालकास जमावाने बेदम मारहाण केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे वारकऱ्यात हलकल्लोळ उडाला. ट्रकमधील महिला वारकरी भयभीत झाल्या होत्या. लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची फिर्याद ट्रक चालक श्रीकांत मनवाडकर यांनी दिली आहे. वारकरी परशुराम जाधव व तुरमुरी येथील ग्रामपंचायत सदस्य व महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते सुरेश राजूकर हे दोघेजण मारहाणीत जखमी झाले. जखमींना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत.

तर परस्पर विरोधी तक्रारामध्ये फिर्यादी सुखदेव कट्टीकर हे शेळ्या चारत असताना त्यांचा मित्र अजित शेजूळ चार चाकी वाहनातून आला. तेव्हा वारकऱ्यांचा ट्रकचालक याने शेजूळ यांना पत्ता विचारत असताना दोघांत वाद झाल्याने ट्रक चालक श्रीकांत मनवाडकर याने डोक्यात दगड घालून मारहाण केल्याची फिर्याद सुखदेव कट्टिकर यांनी मिरज ग्रामीण पोलिसात दिली आहे. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार संजय झोडगे व कर्मचारी करीत आहेत.


