
सांगलीत शिवसेनेच्या गुंठेवारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन गुंठेवारी समितीचे प्रदेशाध्यक्ष चंदनदादा चव्हाण यांनी कच्ची भवन येथे केले होते. याप्रसंगी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यासाठी शिवसेनेचे नेते संजय राऊत, महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील, जिल्हाप्रमुख संजय विभुते यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळेस शिवसेना गुंठेवारी समितीचे प्रमुख चंदन चव्हाण यांनी चंद्रहार पाटील यांना लोकसभेच्या निवडणुकीसाठी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली.
याप्रसंगी बोलताना शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले, सांगलीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या दृष्टीने झालेला हा पहिला मेळावा आहे. महाविकास आघाडी तर्फे निवडणुकीला आपण उभा केला. श्रीमंत लोकांची, सहकार सम्राटांची मक्तेदारी असलेला भाग समजला जातो. ज्याच्या कारखान्यावर शे पाचशे कोटींचा कर्ज आहे अशाच लोकांना आतापर्यंत या भागांमध्ये उमेदवारी दिली आहे.सांगलीमध्ये प्रथमच एक अत्यंत सामान्य कुटुंबातला, शेतकऱ्याचा मुलगा ज्याने कुस्ती क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा नावलौकिक देशांमध्ये वाढवला, सांगली जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला असे चंद्रहार पाटील. डबल महाराष्ट्र केसरी यांना आपण उमेदवारी दिली आणि सामान्य कुटुंबातील लोकांचा पाठिंबा मिळत जातो. पण धनशक्ती पुढे त्याचा टिकाव लागत नाही आणि म्हणून आणि मतदान बरोबर म्हणजेच वोट बरोबर एक नोट सुद्धा देतात.चंदन दादा आपण तर लाखभर रुपयांचे दान दिले. चंद्रहार पाटीलच्या मागे या जिल्ह्यातला सामान्य शेतकरी मजबुतीने उभा राहील कारण चंद्रहार पाटील सारखा शेतकऱ्याचा मुलगा हाच सांगलीचे नेतृत्व करू शकतो त्याचा आवाज राष्ट्रीय स्तरावर बुलंद करू शकतो.
आज सकाळी पाहत होतो, सांगली जिल्ह्यातला सगळ्यात मोठा पाण्याचा प्रश्न आहे. पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात दहा वर्षे खासदारकी भोगलेला माणूस हा प्रश्न सोडवू शकत नसेल तर मला असं वाटतं आपण त्याला आता घरी बसवायला पाहिजे आणि महाविकास आघाडीच्या चंद्रहार पाटलांना आपण संधी दिली पाहिजे. असा टोला भाजपचे संजय पाटील यांना राऊत यांनी लगावला.
काही दिवसांपूर्वी आमचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी मिरजला प्रचंड सभा घेतली म्हणजे अशी सभा ती स्वतः उत्स्फूर्तपणे चंद्रहार पाटलांच्या विजयाच्या घोषणेसाठी झालेली होते. तुम्ही शिवसेनेच्या विजयाच्या घोषणा देता, जिकडे जाऊ तुम्हाला तिकडे शिवसेना दिसेल, भगवा झेंडा दिसेल. आणि वातावरण मला सांगलीमध्ये अधिक प्रकर्षाने जाणवतयं. वसंतदादा पाटील आणि बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध. शिवसेना ही मराठी माणसाचा स्वाभिमान आहे. शिवसेना ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची रक्षण करत आहे. वसंतदादा पाटलांनी नेहमीच मदत केली. म्हणून जेव्हा जेव्हा शिवसेनेवर आणि बाळासाहेब ठाकरे अडचणीत होते त्या प्रत्येक वेळेला वसंतदादा पाटील यांनी शिवसेनेची पाठ राखण केली तीही ठामपणे. असे राऊत शिवसेनेच्या गुंठेवारी कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी बोलत होते.

