सांगली प्रतिनिधी | किरण सोनवणे | खबऱ्या ऑनलाईन – सांगलीतील जागा वाटपाचा तिढा वाढला आहे. याच जागांचा तिढा सोडवण्यासाठी वारंवार बैठका घेतल्या जात आहेत. परंतु आता या बैठकांना काँग्रेस कंटाळली आहे. ‘रोज तेच दळण दळत बसायचे, मग भाकरी कधी करणार?,’ असा प्रश्न काँग्रेसकडून विचारला जाऊ लागला आहे.
सांगलीची जागा काँग्रेस सोडायला तयार नाही. सांगलीतील जागेबाबतचा वाद कमी न झाल्यास काँग्रेस वेगळी चूल मांडण्याची तयारी करत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. कोल्हापूरची जागा काँग्रेसला दिल्याने शिवसेनेने सांगलीवर दावा सांगितला आहे. परंतु सांगलीत शिवसेनेचा साधा एक नगरसेवक नाही. काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने येथे काँग्रेस तडजोड करायला तयार नाही.
महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या विलंबाबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाकरे आणि पवार गटाने जागा वाटप ताणून धरल्यास पर्यायी चूल मांडण्याची ताकद ठेवल्याचा काँग्रेसने दावा केला आहे. वारंवार बैठका घेऊन हा तिढा अधिकच वाढत चालला आहे. पुढे संघर्ष तीव्र आहे. हुकुमशाहीला रोखण्यासाठी आघाडीत समन्वय गरजेचा आहे. बैठका घेऊन त्यात जास्त वेळ जात आहे. या बैठकांच्या सत्राला काँग्रेस वैतागली आहे. लवकरात लवकर मार्ग काढून निवडणुकीच्या मैदानात महाविकास आघाडीचे नेते असायला पाहिजे, असेही मत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने व्यक्त केले आहे.
सांगलीच्या जागेबाबत उद्धव ठाकरे हे घाई करताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांनी काल चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली असून काँग्रेसने देखील या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध ठाकरे गट आमने-सामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

