मुंबई प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – राज्यात राजकीय धुळवडीला सुरुवात झाली आहे. तर रंगपंचमी हा सण देखील काही दिवसांवर आला आहे. अनेक ठिकाणी रंगपंचमीच्या उत्सवालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडत बंदोबस्त ठेवण्याची आणि विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडून करण्यात आला आहे.
होळीच्या निमित्ताने शहरात कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याबाबत काळजी घेण्यात यावी, असे आदेशही आयुक्त फणसाळकर यांनी दिले आहेत.
मुंबईत होळीनिमित्त वेगळीच मज्जा यला मिळते. विशेषतः तरुणाई मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी करताना यला मिळते. यासाठी काही इव्हेंट कंपन्यांकडून मोठमोठ्या कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येते. तर काही ठिकाणी आजही पारंपारिक पद्धतीने रंगपंचमी साजरी केली जाते, ज्यामुळे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी विशेष सूचना केल्या आहेत.
होळी, धूलिवंदन उत्सवादरम्यान महिलांच्या अंगावर रंग, पाणी फेकणे, त्यांची छेडछाड, विनयभंग करणे, असे प्रकार घडण्याची शक्यता आहे. पादचारी, वाहनचालकांवर रंगाचे फुगे मारल्याने होणारे अपघात, मर्यादेपेक्षा आवाजात ध्वनिक्षेपकांचा अमर्याद वापर, गाण्यांच्या तालावर नृत्य, धार्मिक वाद, रंग उधळणे, पोलिसांशी हुज्जत घालणे, होळीसाठी लाकडे चोरून नेणे, आदी कारणांमुळे कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करणे आणि त्यासाठी विशेष खबरदारी घेणे, असे आदेश पोलीस आयुक्तांकडून देण्यात आले आहे.
चौकाचौकांमध्ये साध्या वेशातील पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त नेमणे. इतर धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांसमोर, संमिश्र वस्ती असलेल्या क्षेत्रात रंग उडवणे, गुलाल उधळणे, पाण्याच्या रंगाचे फुगे मारणे, आक्षेपार्ह गाणी वाजविणे, घोषणा देणे यांबाबत विशेष दक्ष राहणे आणि जबरदस्तीने वर्गणी गोळा करणे व त्यावरून होणारे वाद यांमध्ये वेळीच हस्तक्षेप करून तत्काळ कारवाई करणे, अशा सूचना मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी केल्या आहेत.
त्याशिवाय, धार्मिक भावना दुखविण्यासारख्या चित्रफिती व ध्वनिफिती सादरीकरण किंवा प्रसारित होणार नाहीत, याची विशेष खबरदारी घेणे. सार्वजनिक किंवा मोठ्या स्वरूपाच्या होळ्या पेटविण्याचे ठिकाणी गर्दीचे योग्य व्यवस्थापन करणे, गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष ठेवून मारामारी, इतर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेणे. धूलिवंदन व रंगपंचमीच्या वेळी परंपरेने चालू आलेल्या प्रथेनुसार काही लोक भांगमिश्रित दूध प्राशन करतात. यादिवशी दूधभेसळीचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे सतर्क राहा, असेही आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

