कोल्हापूर प्रतिनिधी | रियाज जैनापूरे | खबऱ्या ऑनलाईन : ‘राजर्षी शाहू महाराज यांच्या समतेचा, सर्व घटकांना मुख्य प्रवाहित सामील करुन विकासात्मक वाटचालीचा आणि कोल्हापूरच्या सर्वंकष उन्नतीचा विचार दिल्लीपर्यंत पोहोच करण्यासाठी आपण लोकसभेच्या मैदानात उतरत आहोत.
जनतेने प्रचंड आग्रह धरल्यानेच हा निर्णय घेतला आहे. आपली उमेदवारी म्हणजे कोल्हापूरच्या जनतेच्या स्वाभिमानाची लढाई आहे. त्यामुळे ही लढाई जिंकण्यासाठी त्यांचाच पुढाकार असेल’, अशी भावना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी गुरुवारी रात्री व्यक्त केली.
इंडिया आघाडी व महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी श्रीमंत शाहू महाराज यांची उमेदवारी घोषित झाली. ते काँग्रेसच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार मित्र पक्षांची पसंती त्यांच्या उमेदवारीला मिळाली आहे.
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी श्रीमंत शाहू महाराज यांच्या नावाची चर्चा होती. त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाल्यापासून सर्वपक्षीय संघटना, संस्थांनी त्यांच्या उमेदवारीचे स्वागत केले. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर कोल्हापुरात आनंदाचे, उत्साही वातवरण निर्माण झाले. अनेक ठिकाणी फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. समाजातील विविध संघटना, मान्यवरांनी महाराजांची भेट घेऊन पाठिंबा दिला. या निवडणुकीत महाराजांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार करतानाच त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. उमेदवारीच्या घोषणेत आघाडी घेतल्याने महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही प्रचाराच्या नियोजनाला लागले. यामुळे आघाडीत नवउत्साह निर्माण झाला आहे.
कोल्हापूरचा विकास हाच अजेंडा
कोल्हापूरचा विकास हाच अजेंडा घेऊन आपण लोकसभा निवडणूक लढवत आहोत. कोल्हापूरची जनता सूज्ञ आहे. त्यामुळे राजर्षी शाहूंचा वारसा जपणाऱ्या गादीला मान आणि मत दोन्ही देतानाच विकासाला नवा चेहरा देण्यासाठी पुढाकार घेईल याची खात्री आहे. यातून समतेचे नवे पर्व सुरू करण्याची संधी जनता निश्चितपणे साकार करेल याचा विश्वास आहे, असे ते म्हणाले.

