मुंबई /पुणे/ सांगली (विशेष प्रतिनिधी) खबऱ्या ऑनलाईन : एकीकडे महाविकास आघाडीत सारे काही आलबेल असल्याचे चित्र उभे केले जात असताना, काँग्रेस आणि ठाकरे गटात जागावाटपावरून धुसफूस सुरू असल्याचे कळते. संजय राऊत वारंवार माध्यमांसमोर येऊन काँग्रेसच्या हक्कांच्या मतदारसंघांवर दावा करू लागल्याने विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
जागावाटपाच्या बैठकीत ठाकरे गटाकडून जशी आक्रमक भूमिका घेतली जाते, तशीच भूमिका काँग्रेसनेही घ्यावी. कमी जागा मिळणार असतील तर काहीतरी ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात हे आक्रमक भूमिका घेत नसल्यामुळे ठाकरे गट वरचढ ठरत आहे, अशी तक्रार काही आमदारांनी हायकमांडकडे केल्याची माहिती अंतर्गत गोपनीय खबऱ्याला मिळाली आहे.
ठाकरे गट २२, काँग्रेस १६ आणि शरद पवार गटाला १० जागा देत महाविकास आघाडीने जागावाटपाचा तिढा सोडवल्याचा दावा ठाकरे गटातील काही नेत्यांकडून रविवारी करण्यात आला. त्यावर काँग्रेसच्या आमदारांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. दोन गट पडल्यामुळे ताकद संपलेल्या पक्षाला २२ जागा सोडून वरिष्ठ नेते कोणता संदेश देऊ इच्छितात, अशी संतप्त भावना सांगलीतील एका नेत्याने नाव न घेण्याच्या अटीवर गोपनीय खबऱ्याकडे व्यक्त केली.
ठाकरे गटाला त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक जागा न सोडण्याचा आग्रह त्यांनी धरला आहे. त्यामुळे जागावाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी होणार की काय, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
- सांगली लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांच्या उमेदवारीवर काँग्रेस ठाम
सांगलीच्या जागेवर काँग्रेस ठाम आहे. ही जागा आम्हीच लढू. ठाकरे गटाला सांगलीची जागा सुटलेली नाही. त्यांना तसे जाहीर करता येणार नाही. विश्वजीत कदम यांनी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडली आहे.
– नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
कोल्हापूर काँग्रेसला तर सांगली आम्हाला..
महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा पूर्ण झाली आहे. कोल्हापूर ही आमची सीटिंग जागा आहे. ती काँग्रेसला देण्यात येत आहे. कोल्हापुरातून शाहू महाराज हे आमचे उमेदवार असतील. कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा शिवसेनेला देण्यात येईल. त्या ठिकाणी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केली आहे. येत्या दोन दिवसांत उद्धव ठाकरे सांगलीमध्ये जातील. त्या ठिकाणी चंद्रहार पाटलांसाठी ते सभा घेणार आहेत.
– संजय राऊत, खासदार, ठाकरे गट
- वेळ पडल्यास टोकाची भूमिका घेवून आमचीही ताकद दाखवू
सांगली मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील कोणत्याही मित्रपक्षाने यावर दावा करू नये. आम्ही या जागेवर ठाम आहोत. सांगलीची जागा आम्ही सोडणार नाही. संजय राऊत शिवसेनेचे नेते आहेत, ते वैयक्तिक काही सांगत असतील, तर तो त्यांचा प्रश्न आहे. मात्र आम्ही जागा सोडणार नाही. या जागेसाठी टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल, पण जागा सोडणार नाही – विश्वजीत कदम, काँग्रेस आमदार