सांगली जिल्ह्यात भाजप जोमाने वाढत असताना, जिल्ह्यातील जत तालुक्यातून भाजपला धक्का बसलाय. भाजपचे नेते सुनील रावसाहेब पवार यांनी (दि. २६) विटा येथील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला. विटा येथील जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश त्यांनी केला.
यावेळी त्यांचे सहकारी, समर्थक सद्दाम आत्तार यांची राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे पत्रही देण्यात आले आहे. पवार यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीला अधिकचे बळ मिळणार आहे.
पवार यांना मानणारा जत शहरासह तालुक्यात तरुण वर्ग मोठा आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासन व पक्षाच्या चुकीच्या भूमिके विरुद्ध वेळोवेळी आवाज उठवला आहे. त्याचबरोबर त्यांच्या सुविद्य पत्नी सुनिता सुनिल पवार यांनी महिला बालकल्याणच्या सभापती म्हणून काम पाहिले आहे.तसेच त्यांचे बंधू तेलंगाना राज्य हॉलमार्किंग असोसिएशनचे राज्याध्यक्ष विनोद पवार यांचेही सामाजिक कार्य चांगले आहे. या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. यांचा फायदा राष्ट्रवादी पक्षाला होणार आहे. तालुक्यातील अनेक घटक त्यांच्या संपर्कात आहेत.
त्याचबरोबर सुनील पवार यांची माजी आमदार विलासराव जगताप यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख होती. जगताप यांनी त्यांच्यावर भाजपाच्या जत तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती. परंतू अलीकडच्या काळात पक्षांतर्गत मतभेद झाल्याचे दिसून येत होते. पक्षाबद्दलच्या भूमिकेबद्दल वेळोवेळी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान त्यांच्या समर्थकांसह पक्षप्रवेश सोहळा येत्या महिन्याभरात होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहे.

