‘डिटेक्शन’ पेक्षा ‘खाबूगिरी’कडे कलः कारवाई करूनही येरे माझ्या मागल्या…
कोल्हापूर प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन | जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाचे नाक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (एलसीबी) गेल्या तीन वर्षांपासून भ्रष्टाचाराचे, लाचेचे ग्रहण लागले आहे.
ज्या त्या वेळी वरिष्ठांकडून संबंधितांवर कारवाई करून त्यांना त्यांची जागा दाखविली आहे. तरीही ‘ये रे माझ्या मागल्या…’ या म्हणीप्रमाणे काम सुरू असल्याचे दिसून येते. त्यामुळेच नुकतेच तीन पोलिसांना पोलिस अधीक्षकांनी निलंबित केले.
पोलिस अधीक्षक कार्यालयातील ‘एलसीबी’ म्हणजे पोलिस अधीक्षकांची शाखा मानली जाते. जिल्ह्यातील सर्वच पोलिसांवर या शाखेचा दबदबा असतो. एखाद्या पोलिस ठाण्यातील तपासाला समांतर तपास सुद्धा ही शाखा करते. एखाद्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे बंद होत नसतील, तर तेथे छापेमारी करून कारवाई सुद्धा ही शाखा करते. पोलिस अधीक्षकांच्या सुचनेनुसार कारवाई करते, तपास करते. त्यामुळे या शाखेत जाण्यासाठी अनेक कर्मचारी-अधिकाऱ्यांत स्पर्धा असते. पूर्वी ‘डिटेक्शन’वर असलेली स्पर्धा आता खाबूगिरीकडे वळल्याचे दिसून येत आहे.
चक्क एलसीबीच्या कर्मचाऱ्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या दारात लाच घेतली. त्यांना तत्कालीन पोलिस अधीक्षकांनी निलंबित केले. संबंधित निरीक्षकांची बदली केली. मात्र, यामुळे अधीक्षक कार्यालयाचे नाक कापले गेले. त्यानंतर येथे भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले.
तपासाच्या निमित्ताने अवैध धंद्यांशी लागेबांधे वाढू लागले. ज्या त्यावेळी वरिष्ठांना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तेथे बदल केले. काहींची तडकाफडकी बदलीही केली. कर्तव्यात कसूर कारण असले तरीही प्रत्यक्षात त्यामागे अनेक कारणे असल्याचे आजपर्यंत झालेल्या कारवाईतून दिसून येते. नुकतेच पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी एलसीबीतील तीन पोलिसांना निलंबित केले. त्यांच्यावर सुद्धा अवैध धंदेवाल्यांशी हितसंबंध ठेवल्याचा ठपका आहे. तसेच कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. अधिकारी स्वच्छ-प्रमाणिक असले तरीही त्या शाखेतील कर्मचाऱ्यांनी गैरव्यवहार केला, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी शाखेच्या प्रमुखावर येते. त्यामुळे वेळीच सावध होऊन पंडित यांनी तीन पोलिसांना थेट निलंबित केले आहे. मात्र खाबूगिरीकडे अधिक कल वाढत असल्यामुळे या शाखेची नामुष्की दिवसेंदिवस वाढत आहे.वर्षापेक्षा अधिक काळ येथे अधिकारी राहत नसल्याचेही दिसून येते.
प्रकरणांमागून प्रकरणे …
पोलिस मुख्यालयात लाच घेताना एक महिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकली. एका आर्थिक गैरव्यवहारातील तपासात महिला अधिकाऱ्याची चौकशी सुरू आहे. दिवाळीपूर्वी एलसीबीतील काही पोलिसांना कारणे दाखवाच्या नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. यावरून तेथे सुधारणेला वाव असल्याचे दिसून येते.

