Politics News । राज्याचे माजी पर्यटन मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शिंदे सरकारबाबत मोठा दावा केला आहे. ३१ डिसेंबरपर्यंत शिंदे सरकार पडेल, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. २०२४ मध्ये देशात आणि महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होणार असल्याचे ते म्हणाले. आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. सावंतवाडी येथील जाहीर सभेनंतर त्यांनी हे मोठे वक्तव्य केले.
आमदारांच्या सदस्यत्वाबाबत विधानसभेत सुरू असलेल्या सुनावणीवर आदित्य ठाकरे म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांनी ३१ तारखेला किंवा त्यापूर्वी निर्णय घ्यावा. मात्र, हे सरकार फार काळ टिकणार नाही. डिसेंबरमध्ये हे सरकार पडणार आहे. असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू आहे. संविधान आणि लोकशाही डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले. निवडणुका जाहीर कराव्यात नाहीतर शिंदे गटाला हाकलून द्या. तरच राज्यात लोकशाही टिकेल, पेट्या घेणाऱ्यांच्या मनात काहीतरी असेल. त्यांना देशातील लोकशाही संपवायची आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

