एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा २०२३ च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून जेतेपदावर नाव कोरलं. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव केला.
या विजयासह ऑस्ट्रेलियाने विक्रमी सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषकावर आपल्या देशाचं नाव कोरलं. या सामन्यातील भारताच्या पराभवावर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्याऐवजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला, यावरून बीसीसीआयवर टीका होत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदार संजय राऊत यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार राऊत म्हणाले, मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे हे सगळ्यांना माहिती आहे. अशा प्रकारचे मोठ्या स्पर्धांमधले मोठे सामने (अंतिम सामना, बाद फेरीतले सामने) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होतात. परंतु, मुबंईतून सगळंच खेचून नेलं जातंय. मुंबईतले उद्योग, मोठी व्यावसायिक कार्यालये, पैसे आणि आता क्रिकेटही नेलं जात आहे. या ओढाताणीत गडबड झालेली दिसते.
संजय राऊत म्हणाले, आपला संघ उत्तम खेळला. रोहित शर्माच्या नेतृत्वात आपण सलग १० सामने जिंकले. परंतु, अंतिम सामन्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर आपण हरलो. अनेकजण म्हणत आहेत की, हा सामना वानखेडे स्टेडियमवर झाला असता तर आपण जिंकलो असतो. मला त्यातली फार माहिती नाही. कारण मी मोठा क्रिकेटरसिक नाही.
खासदार राऊत म्हणाले, अहमदाबाद येथील स्टेडियमचं सरदार वल्लभभाई पटेल हे नाव काढून टाकलं आणि त्या स्टेडियमला नरेंद्र मोदी स्टेडियम असं नाव दिलं. कारण, यांना तिथे वर्ल्डकप खेळवायचा आणि जिंकायचा होता. भारत जर त्या सामन्यात जिंकला असता तर नरेंद्र मोदी स्टेडियमवर जिंकला, नरेंद्र मोदी तिथे उपस्थित होते म्हणून जिंकला अशा प्रकारचा प्रचार करायचा असा भाजपाचा मोठा गेमप्लॅन पडद्यामागे सुरू होता. परंतु, या देशाचं दुर्दैव की आपले खेळाडू चांगले खेळूनही आपण हरलो.