दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात देशभरात आणि राज्यभरात पार पडला. मात्र हीच दिवाळी सांगली मिरजेतील लोकांना फार महागात पडली. कारण या काळात शहरात अनेक ठिकाणी घरफोडीच्या, चोरीच्या घटना घडल्या आहेत. लाखोंचा ऐवज लुटला गेला आहे. ऐन दिवाळीत, बंद घर फोडून चोरट्यांनी हात साफ करत मुद्देमाल चोरल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे चोरट्यांची दिवाळी मात्र चांगलीच जोरात झाली आहे. चोरट्यांनी घातलेल्या या धुमाकूळामुळे सामान्य नागरिक मात्र बरेच धास्तावले आहेत.
शहराच्या विविध भागातील बंगले, फ्लॅट्समधून सोन्याचे दागिने आणि रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज चोरी केल्याच्या घटना घडल्या. दिवाळीत अनेक जण गावी किंवा बाहेर फिरायला जातात. त्यामुळे घरं बंद असतात. हीच संधी साधून चोरट्यांनी घरफोडी करून मौल्यवान वस्तू, दागिने, रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज चोरला. जिल्ह्यातील वाढते चोरी घरफोडीचे प्रमाण पाहता नागरिक भयभीत झाले असून सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी ठोस भूमिका घेणे गरजेचे असल्याने वारंवार लोक तक्रारी करून हतबल झाले आहेत.
एकीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी अवैध धंदे बंद करा म्हणून दिलेल्या सक्तीच्या आदेशाला केराची टोपली दाखविली असली तरी ठराविक हद्दीत मात्र प्रशासनाच्या कायद्याप्रमाणे अवैध असणाऱ्या व सर्वश्रुत असलेल्या घडामोडी बिनधास्त सुरू आहेत.
पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली हे कोणतेही ठोस पाऊल उचलत नसल्याच्या तक्रारी वाढत असून लोकांच्यात नाराजी असल्याचे बोलले जात आहे.