कडेगांव:- कडेगांव तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक काही केल्या नियंत्रणात येताना दिसत नाही मात्र कडेगांव तहसील प्रशासन ही माघार घेण्यास तयार नसून तहसील प्रशासनाने सुध्दा कारवाईचा धडाका लावला आहे. तहसीलदार अजित शेलार स्वतः रात्रीचे बाहेर पडत असून त्यांनी एका ट्रॅक्टर वर कारवाई करून तहसील कार्यालयात आणून लावला आहे तर मंगळवारी शाळगांव मंडळ अधिकारी यांच्या पथकाने एक ४०७ टेम्पो कारवाई करून तहसील कार्यालयात आणून लावला आहे. वैशिष्ठ्य म्हणजे ह्या दोन्ही कारवाया वांगी येथे झाल्या आहेत.
कडेगांव तालुक्यातील अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असेल तरी वाळू तस्करांचे प्रशासनातील लोकांशी असलेलं संबंध पाहता तालुक्यातील अवैध वाळू तस्करी पूर्णपणे बंद होईल अशी अपेक्षा सर्वसामान्य लोकांनी न ठेवलेली बरी असे म्हणावे लागेल. प्रांताधिकारी अजय शिंदे यांनी भरारी पथकांवर कारवाई करणार असल्याचे सांगितल्याने थोड्या आशा पल्लवित झाल्या आहेत मात्र फक्त बोलून चलनात नाही तर कारवाई होने गरजेचे आहे. तहसीलदार अजित शेलार यांनी स्वतः मैदानात उतरत महिन्याच्या प्रारंभी एक ट्रॅक्टर वांगी येथून ताब्यात घेतला व तहसील कार्यालयात आणून लावला होता तर मंगळवारी रात्री शाळगाव मंडळ अधिकारी रामेश्वर जयभाय व तलाठी रघुनाथ कुंभार यांच्या पथकाने एक ४०७ टेम्पो ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात आणून लावला आहे .
ट्रॅक्टर मध्ये १ ब्रास तर टेम्पो मध्ये अंदाजे पाऊण ब्रास वाळू असल्याचे सांगण्यात येत आहे. वैशिष्ठ्य म्हणजे या दोन्ही कारवाया वांगी येथे करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील अवैध वाळू तस्करांशी प्रशासनातील अनेक लोकांचे संबंध असल्याने राजरोसपणे अवैध वाळू तस्करी सुरू असते असं येरळा काठच्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

