• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | काँग्रेसचा हातावर हात, शिवसेना सुस्त ,भाजप नेत्यांना वेळ मिळेना..! राष्ट्रवादी आक्रमक..!

Admin by Admin
April 8, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, माफ करा स्पष्ट बोलतो, राजकीय
1 min read
0
सांगली | काँग्रेसचा हातावर हात, शिवसेना सुस्त ,भाजप नेत्यांना वेळ मिळेना..! राष्ट्रवादी आक्रमक..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

शिराळ्याचे माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्या घरवापसीमुळे जिल्हा परिषदेमध्ये शतप्रतिशत राष्ट्रवादीच्या तयारीत पक्षाचे नेते असल्याचे दिसून आले.

नाईकांच्या पाठोपाठ भाजपला उसनवारीवर दिलेले आयते नेतृत्व परत घेण्याच्या तयारीत राष्ट्रवादी असताना काँग्रेस मात्र आहे ते टिकविण्यासाठीही प्रयत्नशील दिसत नाही, तर शिवसेना राज्यात सत्तास्थानी असतानाही लोकांच्या समोर जाण्यासाठी अजूनही ताकद निर्माण करण्यासाठी फारसे प्रयत्न करीत असल्याचे आढळत नाही.

येत्या तीन-चार महिन्यांत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी उडणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सध्या प्रशासकीय राजवट सुरू असून ओबीसी आरक्षणाच्या मुद्दय़ावरून निवडणूक लांबणीवर पडली असली तरी आता पावसाच्या हंगामानंतर या निवडणुका घ्याव्या लागतील असे एकंदरीत चित्र आहे. या दृष्टीने राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली असून गतवेळीप्रमाणेच क्रमांक एकचा ठरलेला भाजप राज्यातील सत्ता गेल्याने अस्वस्थ आहे. गेली पाच वर्षे जिल्हा परिषदेची सत्ता भाजपने शिवसेना, रयत आघाडी, विकास आघाडीच्या कुबडय़ा घेऊन चालवली असली तरी अखेरच्या टप्प्यात पदाधिकारी बदलावरून पक्षांतर्गत संघर्ष विकोपाला गेल्याचे दिसून आले. यातून दोन सदस्यांनी बाहेर पडण्याचा मार्ग पत्करला, तर मुदत संपण्यास महिन्याचा कालावधी उरला असताना पाच कोटींच्या वॉटर एटीएमचा ठेका कोणाला द्यायचा आणि त्यामध्ये हिस्सेकरी कोण यावरून जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी राडा झाला. तरीही भाजपच्या सुकाणू समितीने जणू काही घडलेच नाही अशी गांधारीची भूमिका प्रकरण पोलीस ठाण्यात दाखल होणार नाही याची दक्षता घेत पक्षाची गेलेली अब्रू सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

सांगली, मिरजेमध्ये भाजपचे आमदार आहेत, मात्र, त्यांच्याकडे पक्षवाढीसाठी वेळच नाही अशी स्थिती आहे. सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ तर पक्षापेक्षा स्वप्रतिमा जपण्यात आणि विकासपुरुष म्हणवून घेण्यातच जादा रस घेतात. महापालिकेत महाविकास आघाडीच्या काळात पाचशे कोटींचा अपहार झाल्याचा आरोप करूनही त्यांनी याची चौकशीची केलेली मागणी आयर्विन पुलाच्या पलीकडे ऐकू जाणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली्. पक्षाची ताकद राष्ट्रवादीच्या बळावर आहे हे जाणूनच ते पालकमंत्री जयंत पाटील यांना कोणतेही बोल लागणार नाहीत, या पद्धतीने बोलणे-वागणे सांभाळून आहेत.

एके काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सांगली जिल्ह्यात काँग्रेसचे दोन आमदार आहेत तेही एकमेकाचे पै-पाहुणे. जिल्ह्यात आजही काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, मात्र त्यांना ताकद देण्याची गरज भासते हे काँग्रेस नेतृत्वाच्या गावीही नसावे याचे आश्चर्य वाटते. महापालिकेत सर्वाधिक सदस्य असताना राष्ट्रवादीने महापौर पद बळकावल्यानंतर सर्व निर्णय सत्ताबाह्य केंद्राच्या हाती गेले तरी काँग्रेस सदस्यांना कोणी विचारत नाही हे असेच चालणार असेल तर काँग्रेसला फार मोठे भवितव्य उरणार नाही हे सांगण्यासाठी ज्योतिषतज्ज्ञाची गरज भासणार नाही.

गेल्या आठवडय़ात सांगलीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा सांगली दौरा झाला. या वेळी शिराळय़ात शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून शिवाजीराव नाईक यांची घरवापसी झाली. आ. मानसिंगराव नाईक यांच्या पुढील कारकीर्दीस मार्ग निर्धोक करण्याचा प्रयत्न झाला असला तरी गावपातळीवरील असलेला संघर्ष एवढय़ा तातडीने संपेल असे मात्र नाही. या ठिकाणी काँग्रेस कमजोरच आहे. काँग्रेसची उरलीसुरली ताकदही सत्यजित देशमुख यांच्या रूपाने देशमुख गट भाजपवासीय झाला आहे. मात्र पालकमंत्री जयंत पाटील यांचे आणि त्यांचे नातेसंबंध पाहता ते भाजपशी कितपत प्रामाणिक राहतील याची शंकाच आहे. महाडिक गटाने विधानसभेच्या दृष्टीने बांधणी सुरू केली असली तरी त्यांना अगोदर जिल्हा परिषद निवडणुकीत आपली ताकद दाखवावी लागेल.

नाईक यांच्या घरवापसीपूर्वी सांगली बाजार समितीचे अख्खे संचालक मंडळच राष्ट्रवादीमध्ये सामील झाले आहे. आता आणखी एका माजी आमदारांची घरवापसी झाली तर नवल वाटणार नाही. जिल्ह्याची आर्थिक ताकद असलेल्या जिल्हा बँकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असले तरी या बँकेचा कारभार हा सर्वपक्षीय हितसंबंध जोपासण्यासाठीच होत आला आहे. या बँकेच्या माध्यमातून अडचणीतील सहकारी संस्थांना आर्थिक रसद पुरवठा करण्यासाठी उपयोग केला जातो. आटपाडीतील माणगंगा साखर कारखाना, कडेगावचा पृथ्वीराज देशमुख यांचा केन अ‍ॅग्रो आणि खा. संजयकाका पाटील यांचा तासगाव व यशवंत साखर कारखाना या संस्था सध्या आर्थिक अडचणीत आहेत. त्यांना रसद हवी आहे. रसद पुरविण्याच्या बोलीवर घरवापसी होते की, भाजपच्या तंबूत राहून डबल गेमचा धमाका होतो हे लवकरच कळेल.

जानकर नेमके कुठे..?

महाविकास आघाडीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फारकत घेतली असली तरी भाजपचा मित्रपक्ष असलेला राष्ट्रीय समाज पक्ष जवळीक साधत असल्याचे चित्र अहिल्यादेवी स्मारक लोकार्पणवेळी दिसून आले. पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार पंतप्रधानपदी विराजमान झाले तर आम्हाला आनंदच होईल, असे वक्तव्य केल्याने भाजप नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काँग्रेस हतबल…

एके काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सांगली जिल्ह्यात काँग्रेसचे दोन आमदार आहेत तेही एकमेकाचे नातेवाईक. जिल्ह्य़ातील काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, हे काँग्रेस नेतृत्वाच्या गावीही नसावे.

राज्यातील सत्ता मिळाल्याचा लाभ सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मिळावा, ही भूमिका पालकमंत्री जयंत पाटील यांची असून यामुळेच राष्ट्रवादीकडे कार्यकर्त्यांचा ओघ अधिक दिसत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सर्वात चांगली कामगिरी राष्ट्रवादीची दिसेल.

– संजय बजाज, शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी.

भाजपचा त्याग करण्याची कोणाचीच मानसिकता नाही. शिराळा मतदारसंघातील स्थिती विधानसभा निवडणुकीत झालेल्या बंडखोरीमुळे वेगळी वाटत असली तरी जिल्ह्यात आजही भाजप क्रमांक एकचा पक्ष असून तो यापुढेही कायम राहील.

– पृथ्वीराज देशमुख, जिल्हाध्यक्ष, भाजप

Previous Post

पवारांचे आभार, मोदींकडे बाजू मांडल्याने राऊतांकडून कृतज्ञता व्यक्त..

Next Post

सीईओ साहेब , माझ्या मृत्यूच्या कार्यक्रमासाठी तरी माझे हक्काचे पैसे मिळतील का ?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सीईओ साहेब , माझ्या मृत्यूच्या कार्यक्रमासाठी तरी माझे हक्काचे पैसे मिळतील का ?

सीईओ साहेब , माझ्या मृत्यूच्या कार्यक्रमासाठी तरी माझे हक्काचे पैसे मिळतील का ?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group