मुंबई : खबऱ्या प्रतिनिधी / बांगलादेशी मुलींना भारतात आणून त्यांच्याकडून देहविक्री व्यवसाय करून घेणाऱ्या एका टोळीला रोखणे हे एवढेच उद्दिष्ट नव्हे, तर अशी कृत्ये करणाऱ्या संपूर्ण संघटित गुन्हेगारीला रोखणे हे आमचे मूळ उद्दिष्ट आहे, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने नुकतेच सांगली पोलिसांना फटकारले. तसेच, बांगलादेशी मुलींची तस्करी करून त्यांना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या टोळीला रोखणे सांगली पोलिसांना शक्य नसेल, तर प्रकरण
सीबीआयकडे वर्ग करण्याचा इशारा न्यायालयाने दिला. बांगलादेशातून भारतात तरुणींना आणून सांगलीमध्ये वेश्या व्यवसायात ढकलण्यात येते. या मुली भारतात जन्मल्याची खोटी ओळखपत्रे तयार केली जातात. ही टोळी कोण चालवते?बांगलादेशातून मुलींना कोणी आणले? असे प्रश्न उपस्थित करून न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती एस. जी. डिगे यांच्या खंडपीठाने सांगली पोलिसांच्या तपासाबाबत नाराजी व्यक्त केली. भारत-बांगलादेश सीमेवरील घुसखोरी हा अत्यंत गंभीर आणि चिंतेचा मुद्दा असून सांगली पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे आदेशही न्यायालयाने दिले.