कडेगाव :- कडेगाव तालुक्यातील अवैध वाळू तस्करी विरोधातील कारवाई मंदावली असल्याचे पहावयास मिळत असून कडेगाव महसूल प्रशासन अवैध वाळू तस्करी कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करू लागले असल्याचा आरोप येरळा काठच्या शेतकऱ्यांनी केला आहे.
येरळा नदीतील अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी महसूल प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत नाही असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. कडेगावचे तहसीलदार अजित शेलार यांनी याठिकाणी कार्यभार स्वीकारताच अवैध वाळू तस्करी विरोधात मोहीम उघडली व काही दिवसातच अवैध वाळू तस्करी वर अंकुश लावण्यात यश मिळवलं. त्यानंतर प्रांताधिकारी डॉ विजयकुमार देशमुख यांनीही याठिकाणी हजर होताच धडाकेबाज कारवाई करत एक डम्पर पकडला. मात्र दररोज अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी नेमलेली भरारी पथके रोजच रिकाम्या हाताने परतत आहेत आणि इकडं अवैध वाळू तस्करी मात्र राजरोसपणे सुरु आहे.
काही भरारी पथके आणि स्थानिक कर्मचारी अवैध वाळू तस्करांना अर्थपूर्ण अभय देत आहेत असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. तालुक्यातील आंबेगाव, भिकवडी, नेवरी,तुपेवाडी, कान्हरवाडी,वडीये रायबाग, शेळकबाव, वांगी,रामापूर याठिकाणी अवैध वाळू तस्करी होतं असते. कान्हरवाडी येथे काही महिन्यांपूर्वी अवैध वाळू तस्करीच्या वादातून एक खून ही झाला आहे. त्यानंतर प्रशासन थोडं सतर्क झाल्याचं पहावयास मिळत होते मात्र पुन्हा मागचे दिवस पुढं आल्याचे दिसत आहे. काही ठराविक भरारी पथकांच्या दिवशी व ठराविक ठिकाणी हमखास अवैध वाळू तस्करी सुरु असते. यावर आता पुन्हा कारवाई चा वेग वाढवणे गरजेचं असल्याचे बोललं जात आहे. काही दिवसापूर्वी वाळू तस्कर अवैध वाळू तस्करीचे चित्रीकरण करून सामाजिक माध्यमांमधून ते प्रसारित करून वाळू तस्करी करीत असल्याचे समोर आलं होतं.

