विटा ( प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात खरीपाच्या पेरण्या मध्यावर आल्या आहेत. शेतकरी वर्गाने उपलब्ध ओलीवर पेरण्या करण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यात केवळ ३४ टक्के पेरण्या झाल्या आहेत. दमदार पाऊस नसल्याने तालुक्यातील ओढे , नाले कोरडे पडले आहेत. तालुक्यात असणाऱ्या येरळा व अग्रणी नदीचे पात्र कोरडे पडले आहे. शेतकरी दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे.तलावातील पाणीसाठा खालावला आहे. जेमतेम पंधरा दिवस पुरेल इतपत पाणी साठा शिल्लक आहे.
चार दिवसांपूर्वी तालुक्यात पुरेसा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीस सुरूवात केली. रोहिणी पाठोपाठ नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. परंतु, चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आज सोमवार ( ता.२४ ) पावसाने उघडीप दिली आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या काळजात धस्स झाले आहे.
तालुक्यातील लेंगरे तलावातील पाणी सर्वात जास्त खालावला आहे. त्यापाठोपाठ आळसंद, पारे , ढवळेश्वर तलावांचा पाणीसाठा आहे. टेंभू , ताकारी , आरफळ योजनेचे पाणी सोडणे आवश्यक आहे. अन्यथा पिके करपून जातील . अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

