बेडग (ता. मिरज) गावातील कमान प्रकरणी आता गावातील लोकांनी गाव बंद केलं आहे. सामाजिक सलोखा बिघडवून गावाची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, गावातील सरपंच, उपसरपंच यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत, तोपर्यंत गाव बंद राहील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.दरम्यान, याच गटाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दुपारी मोर्चा काढला, निदर्शने केली.
सामाजिक सलोखा बिघडवून गावाची बदनामी करणाऱ्या गावाबाहेरील व्यक्तीवर गुन्हे दाखल करा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा देत बेडग गावातील एका गटाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. त्यावर प्रकरणाची सखोल चौकशी झाल्याशिवाय कोणावरही विनाकारण कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असल्याची माहिती आंदोलकांनी दिली.

निवेदनात म्हंटले आहे की, बेडग येथील अनधिकृत कमानीचे चालू असलेले बांधकाम पाडल्यामुळे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या निर्णयाच्या विरोधात आम्ही सर्व गावकरी मिळून निषेध म्हणून आम्ही आज पासून गाव बंद ठेवून निषेध व्यक्त करत आहोत. आम्हा गावकऱ्यांचा सर्व समावेशक कमानीला कोणताही विरोध नाही.
छत्रपती शिवाजी महाराज, छ्त्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णा भाऊ साठे अशा थोर समाजसुधारकांसह देशासाठी शहीद झालेले बेडग गावचे दोन सुपुत्र महेशकुमार व्हावळ व शिवाजी घोरपडे तसेच बेडग ग्रामपंचायत बेडग सहर्ष स्वागत अशी एकत्रित स्वागत कमान करणेस आम्हा बेडग गावकऱ्यांना कोणतीही अडचण नाही.
या प्रकरणी महेशकुमार कांबळे हे आंबेडकरी समाज व शासनाची दिशाभूल करून आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत. आपण बेडग येथील आंबेडकरी समाज व्यतिरिक्त मातंग समाज, चर्मकार समाज, गोसावी समाज, कोळी समाज, वंजारी समाज असे बारा बलुतेदार रहात असलेल्या गावामध्ये आजपर्यंत कधीही जातीवाद झालेला नाही.
एकमेकांमध्ये सामाजिक सलोखा कायम आहे, परंतु काही समाज कंटकांनी जाती विद्वेश फैलावण्याचे कारस्थान केले आहे. त्याविरोधात आमचे आंदोलन बेमुदत चालू राहील. जोपर्यंत सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचा आदेश शासन स्तरावरून येत नाही तोपर्यंत गावातील सर्व व्यवहार बंद राहतील.” असा इशारा या ग्रामस्थांच्या नेत्यांनी दिला.
या आंदोलनात मल्लिकार्जुन कंगोने, सुजित लकडे, सचिन पाटील, बापू बुरसे, बाळासाहेब पाटील, सतीश पाटील, बाळासाहेब नलवडे, नानासो पाटील सहभागी झाले होते.
निर्णयाविरोधात मुंडण आंदोलन
मुंबईत काल उपमुख्यमंत्री यांनी कमान पाडणाऱ्या सबंधित दोषींवर कारवाईचे आदेश दिले. त्याविरोधात ग्रामस्थांनी आज ( ता. २२) गावात मुंडण आंदोलन केले. सोमवारी ( ता. २४) सर्व ग्रामस्थ मिरजेतून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.

