एकीकडे चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना तासगावकर डोक्यावर घेतात. त्यांची मिरवणूक काढतात. त्यांच्या बदलीनंतर त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करतात, हे चित्र यापूर्वी पहायला मिळाले आहे. मात्र तासगावचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्या बदलीनंतर अज्ञातांनी तासगाव पोलीस ठाण्याच्या आवारात फटाक्यांची माळ लावून आनंद व्यक्त केला. तत्कालीन तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या बदलीनंतरही अशाच प्रकारे फटाक्यांची आतषबाजी झाली होती. या प्रकाराची तालुक्यात चर्चा आहे.
तासगावचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या बदलीनंतर भानुदास निंभोरे यांची पोलीस निरीक्षक म्हणून तासगावला नियुक्ती झाली. मात्र निंभोरे यांना पोलीस ठाण्यातील त्यांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करता आला नाही. त्यांच्याबद्दल अनेक तक्रारी होत्या. त्यांच्याकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे अनेकजण दुखावले होते. त्यांची बदली व्हावी म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले होते. त्यांच्याबद्दल अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही तक्रारी झाल्या होत्या. त्यांच्या हिडीस – पीडिस स्वभावाला अनेकजण कंटाळले होते.
अशा परिस्थितीत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी निंभोरे यांच्या बदलीचे आदेश काढले. त्यांची बदली सोलापूर ग्रामीणला झाली. मात्र बदलीनंतर सुमारे तीन आठवडे झाले तरी त्यांना पदमुक्त केले नव्हते. अखेर पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी गुरुवारी त्यांना रिलिव्ह केले. त्यांच्या जागी सोमनाथ वाघ यांची पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, निंभोरे हे पदमुक्त होताच तासगावात अनेकांनी आनंद व्यक्त केला. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे नाराज असलेल्यांमधील काहींनी गुरुवारी रात्री सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुढील बाजूस, पोलीस ठाण्याच्या आवारात फटाक्यांची माळ लावून आतषबाजी केली. यापूर्वी तासगावच्या तत्कालीन तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या बदलीनंतरही फटाक्यांची आतषबाजी झालेली पहायला मिळाली होती.
तासगावकरांनी आजपर्यंत ज्या – ज्या अधिकाऱ्यांनी चांगले काम केलं त्यांना डोक्यावर घेतले आहे. तत्कालीन तहसीलदार सुधाकर भोसले, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांना लोकांनी अचाट प्रेम दिले. त्यांचे निरोप समारंभही दिमाखदार झाले होते. संजीव झाडे यांची तर ओपन जीपमधून मिरवणूक काढत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून निरोप दिला होता. त्यांना त्यांच्या केबिनमधून खांद्यावरून पुष्पवृष्टी करीत बाहेर आणले होते.
ज्या अधिकाऱ्यांना लोकांनी डोक्यावर घेऊन निरोप दिला त्यांनी काहीही जगावेगळे काम केले नव्हते. मात्र कृष्णात पिंगळे, सुधाकर भोसले, संजीव झाडे या अधिकाऱ्यांच्या जिभेवर साखर होती. त्यांनी कधीही हिडीस – पीडिस केले नाही. आपल्या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला सन्मानाची वागणूक दिली. शक्य त्यांना चहाचा एक कप दिला. प्रत्येकाचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. शक्यतो कोणावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली. यातूनच जनमाणसात त्यांची प्रतिमा तयार झाली. त्यामुळेच या अधिकाऱ्यांना लोकांनीही सन्मानाने निरोप दिला.

