कडेगाव :- कडेगाव तहसील कार्यालयाचा सध्या अद्ययावत असणारा अभिलेख कक्ष यापुढं ही अद्ययावत राहणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण याठिकाणी अभिलेख लेखपाल असणारे महसूल सहाय्यक गिरीश इनामदार यांची नुकतीच बदली करण्यात आली असल्याने सर्वसामान्य जनता व जाणकार मंडळींकडून संबंधित प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कडेगाव तहसील कार्यालयातील अभिलेख कक्ष अगदी अद्ययावत करण्यात आला आहे.मात्र यापूर्वी येथील अवस्था अगदी दयनीय होती .यानंतर याठिकाणी महसूल सहाय्यक गिरीश इनामदार यांची बदली करण्यात आली. अभिलेख कक्षातून बाहेर पडणाऱ्या नकला आणि शासकीय कोषागारात जमा होणारी नक्कल फी यांचा बहुतांश मेळ बसत नसायचा शिवाय याबाबतीतचे अभिलेख अजिबात अद्ययावत नसायचे. जनतेचे अर्ज असो किंवा दिलेल्या नकला असो यांचा अजिबात ताळमेळ नसायचा.
इनामदार यांची बदली झाल्यानंतर त्यांना अभिलेख कक्षाची जबाबदारी तत्कालीन तहसीलदार सौ अर्चना शेटे यांनी दिली आणि येथे पारदर्शक कामाबाबत सख्त सूचना दिल्या. त्यानुसार इनामदार यांनी कार्यभार स्वीकारताच याठिकाणी सुरू असलेला भोंगळ कारभार पहिला थांबवला. येणाऱ्या अर्जाच्या अनुषंगाने दिलेल्या नकलेची माहिती तसेच अर्जा बरोबरच नक्कल फीचे चलन सहिसाठी पाठवणे, शासकीय दप्तर फेरीस्त बनवून अद्ययावत करणे जेणेकरून नंतर शोधताना अडचण येऊ नये, सर्व अभिलेख ऑनलाइन केला , अवकजावक ऑनलाइन केली, रोजची नक्कल फी शासकीय कोषागारात जमा करणे, येणारे अर्ज तात्काळ निकाली काढून लोकांचे हेलपाटे वाचवले, अभिलेख कक्षात झेरॉक्स मशीन बसवून अभिलेख बाहेर जाण्याचे थांबवले यामुळं अभिलेख गहाळ होण्यास प्रतिबंध लागला , गावनिहाय स्वतंत्र टपाल व्यवस्था करून टपाल यंत्रणा जलद केली त्यामुळे टपाल लवकर पोहचू लागले आणि लोकांची कामे लवकर होऊन हेलपाटे कमी झाले अशी अनेक सुधारणा कार्ये करून त्यांनी महसूल वाढीस प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याने जवळपास १० लाख रुपये महसूल शासकीय कोषागारात जमा होऊ लागला.
आता नुकतीच इनामदार यांची बदली सांगली येथे झाल्याने याठिकाणी अभिलेख लेखापाल म्हणून जो कर्मचारी येणार आहे तो हे वळण आहे असे ठेवणार का ? लोकांच्या सोयीसाठी करण्यात आलेल्या ह्या कार्यपद्धती आहे तशी राबवली जाणार का ? तसेच लोकांचे अर्ज तात्काळ निकाली निघणार का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

