कडेगाव तहसीलच्या माह
माहितीचा विषय एक तर उत्तर मात्र दुसरेच…
भोंगळ कारभारावर कोणी लक्ष देणार आहे की नाही?
कडेगाव:- कडेगाव तहसील कार्यालयातून माहितीच्या अधिकाराला राजरोसपणे फाट्यावर मारून माहिती मागणी करणाऱ्या लोकांना उडवाउडवीची किंवा थातूरमातूर उत्तरे देऊन धुडकावून लावलं जात आहे. याचा पुन्हा एकदा प्रत्यय आल्याने तहसील कार्यालयातील माहिती अधिकाऱ्यांनी माहिती अधिकार कायद्याचा नक्की अभ्यास तरी आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. माहिती अधिकाराचे ज्ञान असणारा कोणताही अधिकारी अशा प्रकारची आक्षेपार्ह लेखी उत्तरे देणार नाही असं जाणकार व्यक्तींकडून बोललं जात आहे. कडेगाव तहसील कार्यालयातील हा भोंगळ कारभार नक्की कोणी थांबवणार आहे की नाही ? असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
कडेगाव तहसील कार्यालयात माहितीचा अधिकार अर्ज आला की, त्याबाबत माहिती देण्यासाठी माहिती अधिकारी नेमण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे माहिती अधिकारी माहितीच्या अधिकार कायद्याच्या चौकटीत नसणारी उत्तरे माहिती मागणाऱ्या लोकांना देत असून माहिती अधिकारी माहिती अधिकार कायद्याला अक्षरशः केराची टोपली दाखवत आहेत. उत्तरे देताना थातूर मातूर किंवा उडवाउडवीची उत्तरे अक्षरशः लेखी दिली जात आहेत. याबाबत वरिष्ठानी तात्काळ लक्ष देणे गरजेचं असून लोकांना माहितीच्या अधिकार कायद्यानुसार त्यांना माहिती अवगत करून देणे गरजेचे आहे.
काही दिवसांपूर्वीच माहिती सापडत नाही असं लेखी उत्तर देऊन माहिती अधिकाऱ्यांनी आपलं अज्ञान जगजाहीर केलं होतं आता एका माहिती अधिकार कायद्याला उत्तर देताना संबंधितांनी “अनुषंगाने आपणास कळविणेत येते कि, आपण मागितलेली माहिती बाबत कार्यालयात शोध घेणे सुरु आहे. सदर कागदपत्रे माझ्याकडे प्राप्त होताच त्याबाबत आपणास कळविणेत येईल करिता आपणास आपले अर्जाचे अनुषंगाने कळविणेत येत आहे.” असे लेखी कळवलं आहे. मुळात ज्या विषयाची माहिती मागवण्यात आली आहे त्याचा उत्तरात कुठंही उल्लेख नाही. यावरुन माहिती अधिकारी उत्तरे तयार करताना नक्की शुद्धीवर तरी असतात का? माहिती अधिकार कायद्याला वेळेचं बंधन असते हे माहिती अधिकारी यांना माहीत नसते की काय? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
एकूणच तहसील कार्यालयातील हा सर्व भोंगळ कारभार पाहता याकडे कोणी लक्ष देणार आहे की नाही? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेमधून उपस्थित केला जात आहे.

