– कर्नाटकातून घालवले, आता महाराष्ट्रातूनही घालवू, उद्धव ठाकरे कडाडले!
– कर्नाटकांत द्वेषाचा बाजार बंद झाला, राहुल गांधी यांची मोदींवर जोरदार टीका
– देवेंद्र फडणवीसांनी भाजपचा प्रचार केला, अनेक जागांवर जोरदार पराभव
बेंगळुरू (प्रतिनिधी) – कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा जोरदार पराभव झाला असून, काँग्रेसने बहुमत प्राप्त करत सत्ता हस्तगत केली आहे. हे वृत्तलिहिपर्यंत मतमोजणी सुरू होती, आणि काँग्रेसने १३८ जागांवर विजय प्राप्त केला होता. तर भाजपला केवळ ६३ जागा मिळाल्या होत्या. कर्नाटकी जनतेने द्वेषाचा बाजार मांडणार्या भाजपचा चांगलाच बाजार उठविला होता, त्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीकास्त्र डागले. येथील जनतेने द्वेषाचा बाजार बंद केला आहे, व प्रेमाला स्वीकारले आहे. काँग्रेसच्या विजयाबद्दल त्यांनी मतदारांना धन्यवाद दिले आहेत. दुसरीकडे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील भाजपवर जोरदार निशाणा साधला. कर्नाटकातून हाकलले आता महाराष्ट्रातूनही हाकलून लावू, असा इशारा ठाकरे यांनी दिला आहे. दरम्यान, कर्नाटक निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस गेले होते. तरीदेखील भाजपचा जाेरदार पराभव झाला आहे. मुख्यमंत्री बोम्मई व भाजप नेते बीएस येदियुरप्पा यांनी पराभव स्वीकारला असून, हार-जीत भाजपसाठी नवी नाही, आम्ही पुन्हा मोठ्या ताकदीने उभे राहू, असे हे नेते म्हणालेत. तर काँग्रेसचा हा विजय जनतेचा विजय आहे. जनतेने भ्रष्ट सरकारला घरी पाठवले आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे आम्ही लोकांची मने जोडण्यात यशस्वी झालो आहोत, असेही खारगे यांनी सांगून, विजयाबद्दल आभार व्यक्त केले आहेत.
कर्नाटक विजयाचे शिल्पकार ठरलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी या विजयाबद्दल जनतेला धन्यवाद दिले आहेत. भाजपने आपल्याला जेलमध्ये पाठवले, चौकश्या लावल्या, मला आजही सोनियाजी गांधी मला जेलमध्ये भेटायला आल्याचे आठवून डोळ्यात आश्रू येतात, पण कर्नाटकी जनतेने बाहेरच्यांना त्यांच्या घराचा रस्ता दाखविला आहे. आम्ही कट्टर कर्नाटकी असून, हा जनतेचा विजय आहे, असे शिवकुमार म्हणाले. राज्यभर काँग्रेस कार्यकर्ते जल्लोष करत आहेत. आताच्या ताज्या आकडेवारीनुसार, काँग्रेस आघाडी १३६, भाजप ६३, जनता दल सेक्युलर २२ व अन्य तीन जागा जिंकल्या आहेत. २०१८ पेक्षा ५६ जागा काँग्रेसला जास्त मिळालेल्या आहेत.

