मिरज प्रतिनिधी – मिरजेत किरकोळ कारणावरुन अतुल बाळु कोळी (वय ३९) वर्षे रा. शेरे ता. कराड जि.सातारा या तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करणार्या राजू शंकर जाधव वय ३० वर्षे रा. इंदिरानगर झोपडपट्टी, तासगांव यास जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. के. मलाबादे यांनी जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना सक्त मजुरी अशी शिक्षा सुनावली.
राजू शंकर जाधव याने अंमली पदार्थाचा व्यसनी अतुल बाळू कोळी याच्या डोक्यात दगड घालून चार वर्षापूर्वी खून केला होता. राजू जाधव हा बेघर असल्याने मिरजेत पोलिस ठाण्याजवळ वसंतदादा ब्लड बँक शेजारी जुन्या बंद असलेल्या पीएम रुमच्या मोडकळीस आलेल्या शाैचालयात रात्री झोपत होता. तेथे झोपणारा दुसरा बेघर व अंमली पदार्थाचा व्यसनी अतुल कोळी याने राजू जाधव यांस शाैचालयात झोपण्यास मज्जाव करुन दोन दिवसापूर्वी त्यास दगड मारला होता. या रागातून आरोपी राजू जाधव याने दि. ०५ जानेवारी २०२० रोजी रात्री नऊ वाजता अतुल कोळी हा बंद शाैचालयात झोपला असताना डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. याबाबत शहर पोलिसात राजू जाधव याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यांत आला होता.
पोलिस निरिक्षक राजू ताशिलदार, हवालदार नागेश कांबळे, ऋषीकेश बडणीकर यांनी याप्रकरणाचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले .या खटल्यात सरकारपक्षातर्फे आठ साक्षीदारांनी साक्ष दिली. यापैकी फिर्यादी संजय पाटील, साक्षीदार अरुण लोंढे, वैद्यकिय अधिकारी डॉ. सुरेखा गावडे ,तपास अधिकारी राजू ताशिलदार यांच्या साक्षी ग्राह्य ठरल्या. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे न्यायालयाने आरोपी राजू जाधव यास शिक्षा ठोठावली.
सरकारपक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकिल अरविंद देशमुख यांनी काम पाहिले.

