कडेगाव:- कडेगाव तालुक्यातील भिकवडी (खु) येथील ग्रामसेवकाने ग्रामपंचायत सदस्यांची मासिक सभा कोरम अभावीच पार पाडून या सभेत बेकायदेशीर प्रस्ताव मंजूर करून घेत त्यांचा तत्काळ अंमल ही दिला आहे. सभेतील कोणत्याही ठरावास सूचक अनुमोदक नसून मासिक सभा पार पडण्याचे सगळे नियम धाब्यावर बसवून ग्रामसेवकाने अनागोंदी कारभार केल्याचं समोर आलं आहे. तर संबंधित ग्रामसेवकावर कारवाईची मागणी ग्रामस्थांमधून होऊ लागली आहे.
भिकवडी (खु) येथे गेल्या सुमारे दोन वर्षापूर्वी हजर झालेल्या ग्रामसेवकाचा कारभार अतिशय भ्रष्ट आणि अनागोंदी असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या मात्र त्याकडे कोणीच लक्ष देत नव्हतं. ग्रामस्थ व काही सदस्यांचे म्हणणे आहे की संबंधित ग्रामसेवक कोणाचं ही ऐकत नसून स्वतःचा मनमानी कारभार करत असतात. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी ११ वाजता सदस्यांची मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस सरपंच व फक्त एकच सभासद हजर होते. कोरम पूर्ण न झाल्याने सदर सभा रद्द करून किमान ३ दिवसांनी सर्व सभासदांना पुन्हा लेखी सूचना देऊन सभा घेणे क्रमप्राप्त असताना संबंधित ग्रामसेवकाने त्याच दिवशी ३ वाजता सदर सभा भरवली याची लेखी सूचना कोणत्याही सदस्याला देण्यात आली नाही. आता यावेळी या सभेस फक्त सरपंच उपस्थित होते. यावेळी ही कोरम पूर्ण झाला नाही अशावेळी सभा रद्द करणे गरजेचे असताना ग्रामसेवकाने सदर सभा कागदोपत्री भरवून त्या सभेत तब्बल १० प्रस्ताव मंजूर करवून घेतले. यामध्ये प्रामुख्याने मालमत्तेचे हस्तांतरण, जमा खर्च, निधीचे नियोजन, करवसुली, संभाव्य खर्चास मंजुरी आणि जन्म मृत्यू नोंदी सारख्या संवेदनशील विषयावर चर्चा झाल्याचे दाखवून सदर विषयाचे प्रस्ताव मंजूर केल्याचे कागदोपत्री दाखवले. वैशिष्ट्य म्हणजे या कोणत्याही ठरावास सूचक अनुमोदक घातले गेले नाहीत. संबंधित ग्रामसेवकाने एवढ्यावरच न थांबता सदर ठरावांचा आपल्या दप्तरी अंमल ही देऊन टाकला आहे.
एकूणच ग्रामसेवकाने मासिक सभे बाबत शासनाने दिलेले सर्व नियम धाब्यावर बसवले असल्याचे स्पष्ट होत असून लोकप्रतिनिधीना अंधारात ठेऊन मनमानी कारभार केल्याचं समोर आलं आहे त्यामुळं संबंधित ग्रामसेवकास तात्काळ निलंबित करून त्यांच्या संपूर्ण कारभाराची तपासणी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
ग्रामसेवकाच्या कारभाराने सदस्य ही त्रस्त
सुमारे दोन वर्षपूर्वी कार्यभार स्वीकारलेले ग्रामसेवक सुरुवातीपासूनच मनमानी पद्धतीने कारभार चालवत असल्याने व लोकप्रतिनिधी असणाऱ्या सदस्यांना सुद्धा दाद देत नसल्याने सदस्य सुद्धा त्यांच्या कारभाराने त्रस्त आहेत.
२५ फेब्रुवारी सारख्या आणखी सभा सापडतील
२५ फेब्रुवारी रोजी झालेली सदस्यांची मासिक सभा बेकायदेशीर होती हे सिद्ध झाल्यानंतर आता काही सदस्यांचे म्हणणे आहे की सदर ग्रामसेवकाने केलेल्या कामकाजाची दप्तर तपासणी झाल्यास अशा आणखी अनेक बेकायदेशीर सभा सापडतील.
मालमत्ता हस्तांतरणामुळे बेकायदेशीर सभेला फुटली वाचा
२५ फेब्रुवारीच्या मासिक सभेत मालमत्ता हस्तांतरणाचा ही एक ठराव घेण्यात आला होता. त्यानुसार त्याचा दप्तरी अंमल ही देण्यात आला व मालमत्ता पत्रक वितरित करण्यात आले. संबंधित व्यक्तीने सदर मालमत्ता पत्रक आपल्या सोशल मीडिया खात्याच्या स्टेटस ला ठेवल्याने ते मूळ मालमत्ता धारकाने पाहिले आणि या बेकायदेशीर सभेस वाचा फुटली.