सांगली : सांगलीतील दिलीप व चेतन ओतारी या पितापुत्रांनी तब्बल १६० किलो वजनाची पितळी घंटा बनविली आहे.
मंगसुळी (ता. अथणी) येथे बिरोबा मंदिरात पाडव्याच्या मुहुर्तावर ही घंटा बसविण्यात येणार आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत इतक्या वजनाची घंटा प्रथमच बनविण्यात आल्याचा दावा ओतारी यांनी केला.
मंगसुळीतील बिरोबा मंदिर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. रविवार, अमावस्येला भक्तांची अलोट गर्दी असते. भाविकांनी श्रद्धेपोटी मंदिरात मोठी घंटा बसविण्याचा निर्णय घेतला. त्याचे काम सांगलीत ओतारी यांच्याकडे दिले. घंटेसाठी १८० किलो पितळेचे ओतकाम करण्यात आले.
..म्हणून नक्षीकाम टाळले
कारागिरी झाल्यावर वजन १६० किलो भरले. घंटेतील लोळगा १५ किलोचा, तर साखळी १४ किलोची आहे. घंटेवर घाण साचू नये, यासाठी नक्षीकाम टाळल्याचे ओतारी यांनी सांगितले. नादमधूर आवाजासाठी काही प्रमाणात कासेदेखील मिसळले आहे. घंटेची किंमत तब्बल दोन लाख रुपये झाली. या कामासाठी तीन आठवड्यांचा कालावधी लागला.