मिरज प्रतिनिधी / वाळवा तालुक्यातील मौजे पोखर्णी (झोळंबी वसाहत) येथील जमीन सपाटीकरणाची बनावट अंदाजपत्रके तयार करून शिराळा वनपरिक्षेत्राने खोट्या कागदपत्रांच्या आधारे जमीन सपाटीकरणाचा घाट घातला होता. माहिती अधिकारात हाती आलेल्या कागदपत्रामुळे हा डाव उघडा पडला आहे. त्याची संपूर्ण चौकशी करावी व दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य संघटक सुयोग औंधकर यांनी उपवनसंरक्षक नीता कट्टे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
औंधकर म्हणाले, वाळवा तालु्यातील मौजे पोखर्णी (झोळंबी वसाहत) येथील जमिनी सपाटीकरण करण्यासाठी सहा अंदाजपत्रके सादर केले होती त्यात तांत्रिक मान्यता कार्यकारी अभियंता वारणा कालवे विभागाकडून घेतल्याचे नमूद केले आहे. माहिती अधिकारात माहिती घेतली असता त्यांनी मान्यता दिलीच नव्हती अशी माहिती समोर आली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी खोटी सही व खोटे शिक्के वापरले असावेत असा आम्हाला संशय आहे. त्याची संपूर्ण चौकशी व्हावी. यासंदर्भातील कागदपत्रे व पुरावे जोडून उपवनसंरक्षक कट्टी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे .एमआयडीसी कुपवाड पोलीसात तक्रार अर्ज दिला आहे.एकूण ५८ लाख रुपयांच्या कामाचा गोलमाल करण्याचा हा डाव होता. आम्ही उधळून लावला आहे. याआधी अशा पद्धतीने अनेक कामे झाली असल्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. त्यामुळे संबंधित वनपरिक्षेत्र शिराळा व कार्यालयाची खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणी केली आहे.यावेळी दिग्विजय पाटील, युवराज शिंदे, राजेद्र पाटील आधी कार्यकर्ते उपस्थित होते.

