मिरज; खबऱ्या प्रतिनिधी: रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या बायपास रस्त्यावर बोलवाडनजिक अपघातानंतर कारने पेट घेतला. परिसरातील नागरिकांनी गाडीच्या काचा फोडून आतील कुटुंबाला बाहेर काढल्याने ते बचावले.
मात्र, अपघातात ते जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे काम अपूर्ण आहे. तरीही वाहतूक सुरू आहे. वारंवार मागणी करूनही महामार्ग प्राधिकरणाकडून या रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात येत नसल्याची तक्रार नागरिकांतून होत आहे. पंढरपूर रोडकडून राष्ट्रीय महामार्गावरून आलेल्या कारला हनुमान नगर येथे अपघात झाला. रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्यावर टाकण्यात आलेल्या माती व खडीच्या ढिगावर कार गेल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघात झाल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
या अपघातग्रस्त कारमध्ये मेहता कुटुंबातील पती – पत्नी व त्यांची तीन लहान मुले असे पाच जण होते. येथील स्थानिक नागरिक व परप्रांतीय कामगारांनी गाडीच्या काचा फोडून या कुटुंबाला बाहेर काढले. अपघातात ते जखमी झाले होते. यावेळी अपघातग्रस्त कारने पेट घेतला. शहर पोलिस व अग्निशमन दलास याबाबत माहिती देण्यात आली. मिरज शासकीय रुग्णालयातील रुग्णवाहिकेसही पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन आग विझवली. मात्र, तोपर्यंत कार जळाली होती. रुग्णवाहिकेतून जखमींना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

