• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

आष्ट्यात छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना; प्रशासनाने मध्यरात्री पुतळा हटविला

Admin by Admin
January 4, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
आष्ट्यात छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना; प्रशासनाने मध्यरात्री पुतळा हटविला
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

आष्टा; खबऱ्या प्रतिनिधी; येथील शिवाजी चौकात सोमवारी मध्यरात्रीनंतर रातोरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बारा फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना केली.

भाजपच्या या धक्कातंत्राने गावात एकच खळबळ तर पोलिसांची तारांबळ उडाली. या घटनेमुळे शहराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. प्रशासनाने पुतळा हटविण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी दिला आहे. दरम्यान, मंगळवारी मध्यरात्री उशिरा जिल्हा प्रशासनाने हा पुतळा हटविल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, मंगळवारी सायंकाळी पोलिसांचा आणखी जादा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी जमावबंदी आदेश लागू करून सर्वांना बाहेर काढून चौक ताब्यात घेतला आहे. या चौकाला पोलिस छावणीचे स्वरुप आले असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

आष्टा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचा विषय अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. त्यासाठी काही प्रमाणात निधीही संकलीत केला आहे. मात्र, पुतळ्याची नियोजित जागा शासनाच्या मालकीची आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात शहरातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांच्यावतीने पुतळ्याची नियोजित जागा पुतळा समितीकडे हस्तांतरीत करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी 4 जानेवारीपर्यंत संबंधित जागेचे हस्तांतर करण्याची ग्वाही दिली होती.

दरम्यान सोमवारी (दि. 2) मध्यरात्रीनंतर निशिकांत पाटील यांच्या आदेशानुसार भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण माने व भाजपच्या 300 ते 400 कार्यकर्त्यांनी रातोरात नियोजित जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला. नियोजित ठिकाणी आधीच सुमारे तीन फूट उंचीचा कठडा आहे. या कठड्यावर सुमारे दहा फूट उंचीचा चबुतरा बांधून त्यावर बारा फूट उंचीचा पुतळा बसविला आहे.

भाजपचे कार्यकर्ते मोठ-मोठ्या यंत्रसामग्रीसह या कामगिरीसाठी तीन-चार तास राबत होते. मात्र, आष्टा पोलिसांना त्याचा थांगपत्ताही लागलेला नव्हता. पहाटे पहाटे घाईगडबडीने घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना पुतळा उभारणीच्या अंतिम टप्प्याचे काम पहात बसण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता.

आष्ट्याचे पोलिस निरीक्षक अजित सिद यांनी सकाळी याबाबतची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक बसवराज तेली यांना दिली. तसेच जादा पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी केली. त्यानंतर सकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी, दंगल नियंत्रण पथकाचे अधिकारी व पोलिस कर्मचारी असा एकूण 150 ते 200 पोलिसांचा ताफा 20 ते 25 पोलिस गाड्यांतून घटनास्थळी दाखल झाला. त्यामुळे शहराला आणि पुतळा परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.

पोलिसांनी सकाळी या चौकात येणारे सर्व मार्ग बॅरिकेट लावून बंद करुन प्रवेश बंदी केली होती. त्यानंतर आष्टा नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, आष्ट्याच्या अप्पर तहसीलदार धनश्री शंकरदास तसेच नगरपालिका व महसूल प्रशासनातील अन्य अधिकारी व कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले.

निशिकांत पाटील दुपारी आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पाटील म्हणाले, आष्टा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व्हावा, अशी येथील लोकांची मागणी आहे. परंतु प्रशासनाचा वेळकाढूपणा व स्थानिक राजकारणातून हा प्रश्न प्रलंबित होता. त्यामुळे शिवप्रेमी नागरिकांनी स्वतःच पुतळा उभारून या प्रश्नाची सोडवणूक केली आहे. प्रशासनाने हा पुतळा हटविण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

निशिकांत पाटील यांच्यासह कार्यकर्ते ताब्यात

पोलिसांनी पुतळा परिसरात जमावबंदी जारी केल्यानंतरही तिथे मोठा जमाव जमा झाला होता. यावेळी निशिकांत पाटील व पोलिस अधिकार्‍यांमध्ये वादावादी झाली. निशिकांत पाटील यांना ताब्यात घेत असताना पोलिस व कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी लाठीहल्ला करून उपस्थितांना पांगवले व निशिकांत पाटील, प्रवीण माने यांच्यासह 40 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

बेमुदत आष्टा बंदची हाक

निशिकांत पाटील व भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केल्याच्या निषेधार्थ भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने बुधवारपासून (दि. 4) बेमुदत आष्टा बंदची हाक देण्यात आली आहे. प्रवीण माने यांनी पोलिस ठाण्यातून पत्रकारांशी बोलताना या बंदबाबत माहिती दिली.

Previous Post

निवासी डॉक्टरांचा संप मागे ; महाजन म्हणाले २ दिवसात भरणार १ हजार ४३२ पदे.

Next Post

मिरज परिसरात अपघातानंतर कार पेटली; कुटुंब बचावले..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज परिसरात अपघातानंतर कार पेटली; कुटुंब बचावले..

मिरज परिसरात अपघातानंतर कार पेटली; कुटुंब बचावले..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group