सांगली : ग्रामपंचायत निवडणुकीत आपला उमदेवार निवडून आणण्यासाठी विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. आता निकाल लागल्याने निवडणूक धामधूम संपली आहे.
त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. दमलेले कार्यकर्ते, विजयी, पराभूत उमेदवार सहलीस पसंती देत असल्याचे सर्वत्र चित्र आहे.
आचारसंहितेच्या घोषणेनंतर दुरावलेल्या कार्यकर्त्यांची जुळवाजुळव सुरू झाली. त्यांना कामे वाटून देण्यापर्यंतची जबाबदारी उमेदवारांनी पार पाडली. त्यानंतर कस लागला तो गावोगावच्या कार्यकर्त्यांचाच. गावागावांत स्थानिक नेत्यांच्या सल्ल्याने प्रचार कार्यालये उघडणे, उमेदवारी अर्ज भरण्यापासून पत्रके अहवाल बनवून गावागावातील प्रभागवार पोहोचवून घरोघरी वाटण्यापर्यंतच्या जबाबदाऱ्या
प्रामाणिक कार्यकर्त्यांनी पार पाडल्या.
आता निवडणूक संपल्याने त्या सर्वांचे जीवन आता पूर्वपदावर आले आहे. गेली १५ दिवस उमेदवारांचे घर, कार्यालय उमेदवारांचे कट्टर समर्थकांचे दर्शन सातत्याने होत होते. मात्र आता दमल्या भागलेल्या कार्यकर्त्यांचा ओढा फिरायला जाण्याकडे आहे. वारणा पट्ट्यात चिकुर्डे, करंजवडे, ठाणापुडे, शेखरवाडी, डोंगरवाडी, लाडेगाव, कार्वे, ढगेवाडी भागातील कार्यकर्त्यांनी सहलीला पसंती दिली आहे. पराभूत आणि विजयी उमेदवारही निवांतपणा शोधण्यासाठी गावाबाहेर पडत असल्याचे चित्र आहे.

