खबऱ्या प्रतिनिधी / दिवाळी हा सण काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना काही संघटनांचे व प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधींनी याद्या बनवण्यासाठी सुरुवात केली आहे.
वर्षभरात कधीही न दिसणारे, पावसाळ्यात कुत्र्यांच्या छत्र्या उगवल्याप्रमाणे अमावस्या पौर्णिमेला मुखदर्शन देणारे , आणि समाज हितासाठी कोणतेही ठोस पाऊल न उचलणारे, काही झारीतील शुक्राचार्य आता शासकीय कार्यालयांच्या उंबरठ्याचे रोज पूजन करताना दिसत आहेत.
आपल्याच संघटनेचे काही बाहेरील शहरातील कार्यकर्ते पदाधिकारी यांना गोळा करून शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकत दिवाळीच्या पाकिटासाठी काही जणांनी यंत्रणा लावल्याचे दिसून येत आहे.
खऱ्या अर्थाने शासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे उंबरठे पूजत असताना काही झारीतील शुक्राचार्य प्रामुख्याने दिसत आहेत. वर्षभर केलेल्या काळ्या कारनाम्यावर पडदा टाकण्यासाठी संघटित होऊन दबाव टाकण्याचा प्रयत्नही काही ठिकाणी होत आहे.

म्हणूनच सांगली मिरजेत आठ दिवसांपूर्वी एक नवा ट्रेंड सुरू झाला आहे. आली आली दिवाळी आली… उठा उठा दिवाळी आली, पाकिटासाठी याद्या करण्याची वेळ झाली .असंच म्हणण्याचा प्रत्यय सांगली मिरजेत येऊ लागला आहे.
तर काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा दिवाळीचा कोणताही संबंध नसताना तेलाचे डबे, आणि सामान गोरगरिबांना वाटप करण्याच्या नावाखाली लुटमार सुरू करण्याची प्रथा परंपरा पहायला दिसत आहे.
तर स्वतःला सरकार समजणाऱ्या मिरज तालुक्यातील एका प्रांताच्या ‘ बाबा ‘ ने चक्क पत्रकारांना चाळीस रुपये किलो प्रमाणे पाच किलो साखर मदत स्वरूपात देण्याची योजना काढली आहे.
दोनशे रुपयांची साखर घेण्यासाठी काही पत्रकारांनी मात्र खूपच धावपळ केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी खबऱ्याला सांगितले.

