विटा; खबऱ्या प्रतिनिधी : आमची मदत घेऊन आमच्यावरच उलटणार्या आ. अनिल बाबर यांना योग्य वेळी नक्की जागा दाखवून देईन, असा इशारा भाजपचे प्रवक्ते, आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज विटा येथील एका जाहीर कार्यक्रमात दिला.
त्यामुळे या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे गट आणि भाजपमध्ये किमान सांगली जिल्ह्यात राजकीय चकमकी सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे.
सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांचा सत्कार विटा शहर आणि खानापूर तालुका भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. प्रमुख उपस्थिती म्हणून नाव असूनही या कार्यक्रमाला भाजपचे खासदार संजय पाटील आलेच नाहीत. तसेच एकूणच रागरंग पाहून उपस्थित असूनही भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी न बोलणेच पसंत केले. मात्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. महाविकास आघाडीच्या काळात भाजपचे बहुतांश नेते आणि सेनेचे आमदार बाबर यांच्यात वेगवेगळ्या कारणामुळे दुरावा निर्माण झाला होता. यांत प्रामुख्याने आमदार गोपीचंद पडळकर, खासदार संजय पाटील आणि माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचा समावेश आहे. त्याचीच झलक या कार्यक्रमात दिसून आली.
गेल्या काही वर्षांपासून खासदार संजय पाटील आणि आमदार अनिल बाबर यांच्यात यशवंत साखर कारखान्यावरून वाद विकोपाला गेला आहे. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने आ. बाबर यांना मदत करूनही माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचा आमदार बाबर यांचे पट्टशिष्य तानाजी पाटील यांनी जिल्हा बँक संचालक पदाच्या निवडणुकीत पराभव केला. हा पराभव भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. याच कारणावरून आमदार पडळकरांवर प्राणघातक हल्लाही झाला होता. या सर्वांचे पडसाद आजच्या कार्यक्रमात उमटले. तोच धागा पकडून आ. पडळकर म्हणाले, खानापूर विधानसभा मतदारसंघात अनेक अडचणी आणल्या जात आहेत. 2019 च्या वेळी जी आमची चूक झाली, ती चूक आता 2024 ला दुरुस्त करेन आणि ती वरिष्ठांना सांगून दुरुस्त करणार असल्याचे जाहीरपणे सांगत पडळकर यांनी अप्रत्यक्षपणे बाबर यांना राजकीय विरोध करणार असल्याचे सांगितले.
यानंतर आमदार बाबर बोलण्यास तयार नव्हते. परंतु संयोजकांनी खूप आग्रह केल्यानंतर आमदार बाबर म्हणाले, हा सत्काराचा कार्यक्रम आहे. कोणत्या ठिकाणी काय बोलायचे याचे मला भान आणि संस्कार आहेत, असे सांगून पडळकरांना चिमटा काढण्याचा प्रयत्न केला. त्यावर पालकमंत्री ना. खाडे यांनी आम्ही राज्यात एकजीवाने काम करत आहोत. यापुढेही सर्वच निवडणुकांत एकत्रित काम करू, असे सांगत ही चकमक काहीअंशी संपविण्याचा प्रयत्न केला. परंतु या निमित्ताने जिल्ह्यात शिंदे गट आणि भाजपमध्ये विसंवाद असल्याचे दिसून आले.

