13 ऑक्टोबर : खबऱ्या प्रतिनिधी: जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये मागच्या 4 तासांपासून ठिय्या आंदोलन करणाऱ्या एकनाथ खडसे यांची प्रकृती बिघडली आहे. पोलीस निरीक्षकांच्या दालनातच खडसेंची प्रकृती अस्वस्थ झाली आहे.
रक्तदाब कमी झाल्याने पोलीस स्टेशनमध्येच खडसेंची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या ठिय्या आंदोलनात एकनाथ खडसे यांच्या सह दूध संघाच्या अध्यक्ष मंदाकिनी खडसे, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, महापौर जयश्री महाजन यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी या आंदोलना मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी हेदेखील पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत. चार तास होऊनही दूध संघाच्या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल न झाल्यामुळे खडसे आंदोलनावर ठाम आहेत.
पोलीस गुन्हा दाखल करत नसल्यामुळे खडसे आणि त्यांच्या समर्थकांनी पोलीस स्टेशनमध्येच अल्पोपहार केला. जळगाव जिल्हा दूध संघात अधिकाऱ्यांच्या पातळीवर कोट्यावधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला. याप्रकरणी गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी खडसेंनी केली आहे. जिल्हा दूध संघातील उत्पादनाच्या साठ्याची जबाबदारी ही प्रशासनाची असल्याने दररोज किती उत्पादन साठा हा शिल्लक आहे याचा अहवाल हा व्यवस्थापकीय संचालकांकडे पाठवावा लागतो.
त्यावरून साठ्याबाबत तपासणी केली जाते, तसंच इंटरनल ऑडिटर देखील यामध्ये तपास करतो. ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर साठ्याबाबत अहवाल सादर होतो, मात्र रेकॉर्डमध्ये खाडाखोड केल्याचे आढळून आलं आहे. दुग्धजन्य पदार्थाचा साठा हा गोडाऊनच्या बाहेर न जाता कागदोपत्री दाखवून अंदाजे सव्वा कोटीच्यावर गैरव्यवहार झाला आहे, असा आरोप खडसेंनी केला आहे. तपास केल्यास हा गैरव्यवहार सव्वा कोटीच्या वरही जाण्याची शक्यता, एकनाथ खडसेंनी वर्तवली आहे. त्यामुळे याबाबत दूध संघाच्या व्यवस्थापकांना संशयीतांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.

