कडेगाव:- कडेगाव तालुक्यातील खेराडे वांगी येथील लाचखोर तलाठी मनीषा कुलकर्णी हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले व नंतर अटक केली. अटक करून घेऊन जात असताना खेराडे वांगी ग्रामस्थांनी अक्षरशः फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला आणि “खा म्हणावं आता पैसे अजून किती पाहिजेत?” अशा उद्विग्न शब्दात आपली महसूल प्रशासनावरील नाराजी व्यक्त केली. एखाद्या तलाठयावर कारवाई झाल्यानंतर गावकऱ्यांनी जल्लोष करणे ही बहुधा महसूल च्या इतिहासातील पहिलीच घटना असावी आणि या घटनेनंतर तरी कडेगाव महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता यामध्ये लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.
खेराडे वांगी ता कडेगाव येथील महिला तलाठी मनीषा कुलकर्णी हिला सोमवारी दि १० ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले होते. सातबारा वरील चुकीची आणेवारी दुरुस्त करण्यासाठी तब्बल २० रुपयांची लाच मागून तडजोडी अंती १५ हजार रुपये स्वीकारताना कुलकर्णी हिला रंगेहात पकडले गेले होते. त्यांनतर रात्री उशिरा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कुलकर्णी हिला ताब्यात घेत अटक करून घेऊन जात असताना ग्रामस्थांनी अगोदरच तयारी करून ठेवल्याप्रमाणे फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. ग्रामस्थांच्या जल्लोषावरून त्यांच्या मनात कुलकर्णी हिच्या बद्दल किती राग होता हे स्पष्टपणे जाणवले तसेच “खा म्हणावं आता पैसे अजून किती पाहिजेत?” अशा शब्दात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांसमोरच शेरेबाजी करत महसूल प्रशासनावरील आपला राग व्यक्त केला.
येथील ग्रामस्थांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने वरिष्ठांनी वेळीच योग्य ती कार्यवाही केली असती तर कदाचित आजचा दिवस कुलकर्णी हिला पहावयास लागला नसता आणि खेराडे वांगी येथील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन लागला नसता असं मत येथे उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थांनी व्यक्त केलं.

