भरारी पथक व स्थानिक कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी
कडेगावमध्ये परिपत्रकाची अंमलबजावणी का नाही?
कडेगाव:- कडेगाव तालुक्यात अवैध वाळू तस्करांनी पुन्हा तोंड वर काढले असून महसूल प्रशासन मात्र अजूनही सुस्त असल्याचेच दिसत आहे. मागील आठवड्यात वाळू तस्करांकडून शेतकऱ्यांना जबरी मारहाण झाली होती याबाबत चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे तरीही प्रशासन जागे होण्यास तयार नाही. अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी शासनाने १४ जुन २०१७ रोजी एक परिपत्रक काढले होते त्या परिपत्रकाची अंमलबजावणी कडेगाव तालुक्यात का केली जात नाही? असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. भरारी पथक व स्थानिक कर्मचाऱ्यांवर कारवाई प्रस्तावित करावी अशी मागणी ही जोर धरू लागली आहे.
कडेगाव तालुक्यातील अवैध वाळू तस्करी वडिये रायबाग येथील पत्रकारास मारहाण व नंतर पत्रकरांनी केलेल्या आंदोलना नंतर काही प्रमाणात थांबली होती. मात्र आता पुन्हा वाळू तस्करांनी डोके वर काढले असून आता वाळू तस्कर हात घाई वर आल्याचे पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शेळकबाव येथील वाळू तस्करांनी आपलं वाहन प्रशासनास पकडून दिल्याचे कारण सांगून दोन शेतकऱ्यांना जबरी मारहाण केली होती. याबाबत गुन्हा ही दाखल झाला आहे मात्र यातून प्रशासन काही बोध घेण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १४ जुन २०१७ रोजी एक परिपत्रक काढले होते त्यात १ (१३) मध्ये असे स्पष्ट नमुद करण्यात आलं आहे की, ज्या भागात अवैध उत्खननाच्या घटना जास्त प्रमाणात आढळून येत असतील व अशा भागातील महसूल विभागातील अधिकारी/कर्मचारी यांचे प्रतिबंधात्मक प्रयत्न अपुरे आढळत असतील अशा कर्मचाऱ्यांविरुद्ध वैयक्तिक जबाबदारी निश्चित करुन शिस्तभांगाची कठोर कारवाई हाती घेऊन, अशी कारवाई जास्तीत जास्त ३ महिन्यात पूर्ण करण्यात यावी.
कडेगाव तालुक्यात वांगी शेळकबाव आणि वडियेरायबाग येथे राजरोसपणे अवैध वाळू तस्करी होत असताना आणि याबाबत शेतकऱ्यांकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत असताना कडेगाव तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी आजपर्यंत शासकीय परिपत्रकाचा आधार घेऊन एकही कारवाई का प्रस्तावित केली नाही? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. तर भरारी व स्थानिक कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी म्हणून शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

