वाळू तस्कर आता हातापायीवर उतरले, जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण?
वांगी,वडियेरायबाग आणि शेळकबाव इथून मोठ्या प्रमाणात तस्करी
कडेगाव:- कडेगाव तालुक्यातील येरळा नदीतून अवैध वाळू तस्करी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात सुरू झाली असून या वाळू तस्करीला प्रशासनातील नक्की कोणाचा वरदहस्त आहे? असा सवाल येरळा काठच्या शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात असून तस्कर आता हातापायी वर उतरल्याने यामध्ये जीवितहानी झाल्यास वाळू तस्करांच्या बरोबर महसूल प्रशासनासही जबाबदार धरायचे का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
तालुक्यातील वांगी , वडियेरायबाग, शेळकबाव , शिवणी, नेवरी, आंबेगाव, भिकवडी, तुपेवाडी, कान्हरवाडी याठिकानाहून वाळू उपसा करण्यास मोठी संधी आहे मात्र वांगी,वडियेरायबाग आणि शेळकबाव इथून मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू असल्याचे वारंवार सिद्ध झालं आहे. तर प्रशासनाने भरारी पथके नेमली असताना सुद्धा अवैध वाळू तस्करी खुलेआम सुरू आहे. यातच आता वाळू तस्कर खुलेआम हातापायी वर आले आहेत.मागील दोन तीन महिन्यांपूर्वी हणमंत वडिये हद्दीत वाळू तस्करांकडून कोतवाल आणि पोलीस पाटील यांना धक्काबुक्की झाली होती मात्र हे प्रकरण दाबण्यात आले ,त्यानंतर वांगी येथेही प्रशासनास ट्रॅक्टर पकडून दिल्याच्या कारणाने शेतकऱ्यास वाळू तस्करांनी मारहाण केली होती याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.वडियेरायबाग येथे प्रशासनास खबर दिल्याच्या कारणावरून पत्रकारास मारहाण झाली होती याबाबत तर मोठे आंदोलन झालं होतं.तर आता शेळकबाव येथे दोन शेतकऱ्यांना आठ ते नऊ वाळू तस्करांनी प्रशासनास वाहन पकडून दिल्याचे कारण सांगून जबरी मारहाण केली आहे. याचाही गुन्हा दाखल झाला आहे. या घटनांवरून हे स्पष्ट होत आहे की वाळू तस्कर आता बेभान झाले आहेत. या संघर्षात एखादी जीवितहानी झाली तर महसूल प्रशासनास ही जबाबदार धरायचे का ? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
महसूल प्रशासनाने अवैध वाळू तस्करी आणि त्यातून होणाऱ्या गंभीर परिणामांचा विचार करता कडक पावले उचलावीत अशी मागणी होत आहे.

