रवी राऊत/यवतमाळ
शहरातील अमृत योजनांच्या कामावरील पाईप लाईन लंपास करणाऱ्या पाच जणंना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवार, दि. २८ जुनला सकाळच्या सुमारास वाघापूर परिसरातील चौसाळा मार्गावर पार पाडण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक, हायवा आणि पाईप असा एकूण ३९ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. अजिंक्य बावणे, नामदेव नेवारे, अंकुश राठोड, रोशन चव्हाण आणि धनंजय महाजन सर्व रा. यवतमाळ अशी ताब्यात घेण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहे.

यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या अमृत योजनेतील कामाचे लोखंडी पाईप काही महिन्यापासून लंपास होत असल्याची बाब समोर येत होती. अश्यात मंगळवारी सकाळच्या सुमारास अमृत योजनेच्या कामाची पाहणी करणासाठी गेलेल्या सुपरवायझरला वाघापूर ते चौसाळा मार्गावर एका ट्रकमध्ये क्रेनच्या सहाय्याने पाईप टाकल्या जात असल्याचे दिसले. यावेळी सुपरवायझर मल्हारी वाघा याने त्या ठिकाणी असलेल्या टोळीतील चौघांना हटकले आणि विचारपूस केली. यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामूळे याबाबतची माहिती मुख्य कंत्राटदाराला देण्यात आली.
दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कंत्राटदाराने लोहारा पोलिस ठाण्यात माहिती दिली. यावेळी लोहारा ठाणेदार दिपमाला भेंडे यांनी पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी चौघांना ताब्यात घेत चोरीत वापरण्यात आलेली क्रेन, ट्रक आणि सात लोखंडी पाईप असा एकूण ३९ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सुपरवायझर मल्हारी वाघ यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाच जणांवर लोहारा पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार दिपमाला भेंडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.

अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता…
अमृत योजनेच्या कामात वापरण्यात येणारे लोखंडी पाईप चोरणाऱ्या टोळीतील पाच जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. यापूर्वी किती पाईप चोरी केले, कुणाला विकले, हे देखील तपासादरम्यान समोर येणार आहे. या टोळीने १४ पाईप लंपास केल्याची कबूली पोलिसांसमोर दिल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. या प्रकरणात मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

