मिरज : खबऱ्या प्रतिनिधी; मिरज शहरात वैद्यकीय क्षेत्राची बीजे ज्या रुग्णालयामुळे रोवली गेली, त्या वॉन्लेस रुग्णालयाच्या मदतीसाठी आता इंग्लंडमध्ये सराव सामना होणार आहे.
भारत विरुद्ध इंग्लंडमधील कौंटी संघ लिस्टेशायर या दोन संघांमध्ये चार दिवसीय क्रिकेटचा सराव सामना होणार आहे. यातील दि. 25 जून हा एक दिवस रुग्णालयासाठी मदतनिधी संकलन दिवस असणार आहे.
इंग्लंडमध्ये अपटोनस्टील काऊंटी मैदानावर हा सामना रंगणार आहे. सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्यास असणार्या आणि मिरजेतील वॉन्लेस रुग्णालयाच्या नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी युके वॉन्लेस फौंडेशनच्या माध्यमातून त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
मिरजेतील वॉन्लेस रुग्णालय हे सर्वांत जुने रुग्णालय आहे. दि. 4 जुलै रोजी या रुग्णालयाचा 129 वा वर्धापनदिन आहे. सेवाभावी वृत्तीने हे रुग्णालय डॉ. विल्यम वॉन्लेस यांनी सुरू केले. कोरोनाच्या कालावधीनंतर या रुग्णालयाची आर्थिक स्थिती बिघडली. कर्मचारी व डॉक्टरांचे पगार न भागविता आल्याने रुग्णालयात संघर्ष होऊन रुग्णालयाच्या तत्कालिन संचालकांना राजीनामाही द्यावा लागला होता. सध्या हे रुग्णालय मोठ्या अडचणीत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून या रुग्णालयाला पुन्हा उर्जित अवस्था देण्यासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. शिरोळ येथील एका डॉक्टरांनी 5 लाख रुपयांची देणगी दिली. इंग्लंडमधील नर्स व एक्सरे टेक्निशियनचे काम करणार्या दांपत्यानेही लाखाची देणगी दिली.
या रुग्णालयातर्फे नर्सिंगसह काही वैद्यकीय अभ्यासक्रम चालविले जातात. त्या कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन अमेरिका, इंग्लंड अशा देशांमध्ये अनेकजण वास्तव्यास आहेत. वॉन्लेस रुग्णालय सध्या बिकट परिस्थितीमधून जात असल्याचे इंग्लंडमध्ये राहणार्या त्या माजी विद्यार्थ्यांना समजल्यानंतर त्यापैकी काही माजी विद्यार्थ्यांनी वॉन्लेसच्या नावाने फौंडेशन स्थापन केले. फौंडेशनच्या माध्यमातून जमा होणारा निधी वॉन्लेस रुग्णालयाच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे.
या सामन्यात भारतीय संघात रोहित शर्मा (कर्णधार), के.एल. राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह, उमेश यादव, मोहम्मद सिराज यांचा समावेश असणार आहे. इंग्लंडचा कौंटी संघ लिस्टेशायर संघातून इंग्लंडचे काही प्रमुख खेळाडू खेळण्याची शक्यता आहे.
मंगेशकर कुटुंबियांची आठवण…
गानसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर व त्याच्या कुटुंबियांनी वॉन्लेस रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी 1971 मध्ये मिरजेत संगीत रजनी हा कार्यक्रम घेऊन 12 लाख रुपयांची मदत दिली होती. त्या कार्यक्रमासाठी लता मंगेशकर, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, अनिल मोहिले, अरूण पौडवाल, नर्तकी सुधा यांचा कार्यक्रम झाला होता.
मिरजेत इंग्लंडहून निमंत्रण…
रुग्णालयाच्या संचालिका डॉ. प्रभा कुरेशी म्हणाल्या, वॉन्लेस रुग्णालय वाचले पाहिजे, अशी अनेकांची भावना आहे. त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. दि. 4 जुलै रोजी रुग्णालयाचा वर्धापनदिन आहे. त्या निमित्ताने दि. 15 जून ते 15 जुलै असे एक महिना मोफत व सवलतीच्या दरात वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. इंग्लंडमधील माजी विद्यार्थ्यांनी दि. 25 जून रोजी क्रिकेट सामना व दि. 9 जुलै रोजी समारंभ घेतला आहे. त्यासाठी आम्हाला निमंत्रण दिले आहे.

