खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
सांगलीमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली. प्रवाशांनी खाचखच भरलेल्या खासगी ट्रॅव्हल्सला भीषण अपघात झाला. भरधाव बस रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बस चालकाचा समावेश आहे. अपघाताची ही घटना पलूसच्या घोगाव येथे घडली. या अपघातामध्ये बसमधील १५ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीच्या पलूस तालुक्यातील घोगाव येथे खासगी ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात झाला. भरधाव बसवरील चालकाचा ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये १५ हून अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले. मृतांमध्ये बस चालक आणि क्लीनरचा समावेश आहे.
कराड-तासगाव मार्गावर हा अपघात झाला. भरधाव बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडावर जाऊन बस आदळी. ज्यामध्ये बस चालकासह क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. कराड- तासगाव मार्गावरील रस्त्याचे काम अपूर्ण असून अरुंद रस्त्यामुळे अचानक वेग कमी करावा लागल्याने हा अपघात झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
याप्रकरणी कुंडल पोलिस ठाण्यामध्ये अपघाताची नोंद झाली असून अधिक तपास कुंडल पोलिस करत आहेत. या अपघातानंतर कराड-तासगाव मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

