खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा खूपच कडवी झुंज पहायली मिळत आहे. काँग्रेसच्या कट्टर कार्यकर्त्यापासून ते आत्ताच्या सत्तेत असणाऱ्या महायुतीमधील प्रस्थापित माजी नगरसेवकांपर्यंत कोणी कशा पद्धतीने माकड उड्या मारल्या ते साऱ्या जनतेने पाहिले आहे. अभिनय करण्यासाठी तऱ्हेबाज असणाऱ्या काही उमेदवारांना प्रभागातील समस्या म्हणजे किरकोळ वाटत असून त्यांनी हे आम्ही करतो, ते आम्ही करतो अशी आश्वासने देऊन जनतेला मुर्खात काढण्याचे काम काही दिवसांत केले आहे.
गेल्या २७ वर्षात जे मूलभूत प्रश्न आत्तापर्यंत सोडवू न शकणारे चेहरे पुन्हा पुन्हा मलाच निवडून द्या, म्हणून आपल्या आंबट वाणीने लोकांना गोड बोलत आहेत. ज्यांना प्रभागाची दशा अन् दिशा सुद्धा माहिती नाही असे उमेदवार लाली पावडर लावून शुभ्र इस्त्रीचे कपडे घालून जनमाणसात हात जोडत मिरवत निघाले आहेत. त्यांचे खरे चेहरे ओळखण्यासाठी, त्यांची परीक्षा घेण्यासाठी उमेदवारांना काही जागृत नागरिकांनी दूरध्वनी वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी नेहमीप्रमाणे टांगा वर केला.
उमेदवारांच्या या उधळ्या वृत्तीचा राग आल्याने नागरिकांनी गोपनीय खबऱ्याशी संपर्क साधून तक्रारींचा पाढा वाचला. एकंदरीत अजून विजय पराजयाची मालिका सुरू होण्यासाठी आणि पवित्र मत मतपेठीत बंद करण्यासाठी काही तास शिल्लक असताना केलेला हा बिनडोक खेळ भावी नगरसेवकांचा मेळ बसू देणार का.? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
काही ठरावीक महिला उमेदवारांचे पती होणार कारभारी.?
महापालिका क्षेत्रातील काही महिला उमेदवारांच्या बाबतीत खूप वेगळे प्रसंग पाहायला मिळत आहे. उमेदवार म्हणून पत्नी जरी असेल तरी कारभारी म्हणून सारा कारभार हाकणारा पती महापालिकेत दिसणार आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील काही महिला उमेदवारांना नागरिकांशी संवाद सुद्धा साधता येत नाही. याच महिला उमेदवारांना प्रभागातील मतदारांची संख्या, प्रभागाचे क्षेत्रफळ, आणि प्रभागातील नागरिकांचे असणारे मूलभूत प्रश्न माहीतच नाही. तरीसुद्धा आपल्या पतीच्या जीवावर राजकारण करायला उठलेल्या महिला उमेदवारांना जनता कितपत स्वीकारणार.? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
