खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील सत्ताधारी पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने आले असून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांच्या प्रचारादरम्यान अजित पवार आणि भाजप नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी रंगली आहे.
अजित पवारांनी थेट भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर भाजपच्या मंत्र्यांनीही त्यांना लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अजित पवारांना आधी टोला लगावला आणि नंतर थेट टीका केली.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांवरील ७०,००० कोटी रुपयांच्या कथित सिंचन घोटाळ्याचा खटला अद्याप न्यायालयात सुरू असल्याचे सांगत अप्रत्यक्ष इशाराच दिला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना अजित पवारांनी पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेतील कथित घोटाळ्याचा किस्सा उघड केला आहे. ही फाईल मी बाहेर काढली असती तर मोठा हाहाकार माजला असता, असेही त्यांनी म्हटले आहे.

अजित पवारांनी २५ वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणाचा संदर्भ देत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, १९९९ साली काँग्रेस-राष्ट्रवादी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्याकडे जलसंपदा खाते आले होते. त्या वेळी पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेची फाईल त्यांच्या टेबलावर आली होती. या फाईलमध्ये या प्रकल्पाची किंमत ३१० कोटी रुपये दाखवण्यात आली होती. मात्र चौकशी केली असता अधिकाऱ्यांनी सांगितले की, आधीच्या सरकारने ही किंमत वाढवली होती.
त्या वेळी राज्यात १९९५ ते १९९९ दरम्यान शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते. अजित पवारांच्या म्हणण्यानुसार, एका अधिकाऱ्याने त्यांच्या समोर कबुली दिली की या प्रकल्पाची खरी किंमत २०० कोटी रुपये होती. मात्र १०० कोटी रुपये पार्टी फंडसाठी मागण्यात आले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी स्वतःचे १० कोटी रुपये त्यात वाढवले आणि प्रकल्पाची किंमत ३१० कोटी रुपये करण्यात आली.
अजित पवार म्हणाले की, ही फाईल आजही माझ्याकडे आहे. मी ती फाईल बाहेर काढली असती तर मोठा हाहाकार माजला असता. प्रचारादरम्यान त्यांनी केलेल्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे १९९९ मधील युती सरकारमध्ये भाजपचे दिवंगत नेते महादेवराव शिवणकर हे जलसंपदा मंत्री होते. त्यामुळे या प्रकरणावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

