खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
पुणे महापालिकेची निवडणूक गल्लीबोळात दादा निर्माण करण्यासाठी नाही तर पुण्याची भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. काही मोठी आश्वासने देत आहेत. खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा अशी त्यांची आश्वासने आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.
१५ जानेवारीला तुम्ही सर्वांनी कमळाची काळजी घ्या, पुढचे पाच वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ असे आवाहनही फडणवीस यांनी केले.
पुणे महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ७, ८ आणि १२ मधील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गोखलेनगर येथे सभा आयोजित केली होती. या सभेने भाजपच्या प्रचाराची सांगता झाली. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आदी आदी यावेळी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, मागील काळात बिनडोकपणे कामे केली गेली, बांधलेले उड्डाणपूल पाडावे लागले आहेत. पण आम्ही गरीब व मध्यमवर्गीय पुणेकरांना काय हवे आहे याचा विचार करून पुढच्या २० वर्षाचे नियोजन करत आहोत. पुण्यात गेल्या पाच वर्षांत ३५ हजार कोटींचे २२० प्रकल्प राबविण्यात आले आहेत. पुढील पाच वर्षांत ४४ हजार कोटींची विकासकामे केली जाणार आहेत. मेट्रो मार्गाचा ११० किलोमीटरपर्यंत विस्तार केला जाईल. ८० टक्के वाहतूक ज्या प्रमुख ३२ रस्त्यांवरून जाते तेथे सुधारणा केल्या जाणार आहेत. उड्डाणपूल व भूमिगत रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी कमी होईल.
शिवाजीनगर परिसराच्या विकासासाठी जितका निधी लागेल तो मुख्यमंत्री म्हणून मी देईल. ‘लाडकी बहीण’ योजना बंद होणार नसून पुढील टप्प्यात या लाडक्या बहिणींना ‘लखपती दीदी’ बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जो नगरसेवक लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवले त्यांनाच महापालिकेतील पदे दिले जातील. वडार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ तयार केले. त्या माध्यमातून विविध योजनांद्वारे समाजबांधवांना पंधरा लाख रुपयांचे कर्ज बिनव्याजी उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यातून वडार व रामोशी समाजातून उद्योजक घडविण्याचा प्रयत्न आहे.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुण्याच्या भविष्याचा विचार न करणाऱ्या जुन्या कारभाऱ्यांनी २०१७ मध्ये घरी बसवले होते. तेच लोक पुन्हा सत्ता मागत असून गुन्हेगारांना उमेदवारी देत आहेत. पुण्याचे भविष्य अंधाराकडे नेत आहेत. ‘घड्याळाला मत म्हणजे गुन्हेगारांना मत आणि भाजपला मत म्हणजे विकासाला मत हे सर्वांनी लक्षात ठेवा.

- इथे सभा घेतली की विजय मिळतो
चंद्रकांत पाटील म्हणाले यांनी देवेंद्र फडणवीस यांचे पुण्यावर विशेष प्रेम असून त्यामुळेच त्यांनी समारोपाची सभा पुण्यात घेतली असे भाषणात सांगितले. त्यावर फडणवीस यांनी महाराष्ट्रात शिवाजी महाराज यांचे नाव असलेला हा केवळ एकमेव मतदारसंघ आहे. येथे सभा घेतली की हमखास विजय मिळतो असे नमूद केले. दरम्यान, फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा समारोप गोखलेनगरमध्येच केला होता.

