खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. मंगळवारी जाहीर प्रचार संपला असून, गुप्त रणनीती वाढणार आहेत. महापालिका निवडणुकीत महायुती नसल्याने क्रॉस वोटिंग आणि मतविभाजनाचा फटका उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे.
मतविभाजन टाळण्यासाठी पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या बैठका घेऊन समज दिली जात आहे.
महापालिका निवडणुकीत भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) स्वतंत्रपणे लढत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांनी महाविकास आघाडी केली आहे. पण, उमेदवार पक्षाच्या चिन्हावरच लढत आहेत. वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय समाज, उद्धवसेना, मनसे यांनीही काही प्रभागात उमेदवार उभे केले आहेत. बहुतांश पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्यामुळे मतविभाजन होऊन त्याचा फटका नेमके कुणाला बसणार हे निकालानंतरच कळणार आहे. सध्या अनेक प्रभागांत मतविभाजनाचे चित्र दिसत असल्यामुळे उमेदवारांनी याचा धसका घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराचा प्रारंभ केला, परंतु त्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगलीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जयंत पाटील आणि काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यासह स्थानिक नेत्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली असली तरी प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती जाणवली. या निवडणुकीत क्रॉस मतदानाचा धोका मोठ्या प्रमाणात असल्याने कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे. महापालिकेत संमिश्र नगरसेवकांची निवड होण्याची शक्यता आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ७८ जागांसाठीच्या या निवडणुकीत ३८१ उमेदवार रिंगणात आहेत.
भाजप, शिवसेना, उद्धव सेना, राष्ट्रवादी (शरद पवार), राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष, काँग्रेस अशा प्रमुख पक्षांमध्ये चुरस आहे. शिंदे सेना ७८ पैकी ६२ जागांवर लढत आहे आणि यामुळे कोणत्या पक्षाला फटका बसेल याचीच चर्चा रंगली आहे. स्थानिक पातळीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या नेत्यांनी प्रचारात जोरदार भूमिका घेतली. मात्र, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीसा असंतोष जाणवतो आहे. सांगलीतील नेत्यांनी प्रचारात आक्रमक भूमिका घेतली असली तरी क्रॉस मतदानाची शक्यता आणि स्थानिक पातळीवर होणाऱ्या गोंधळामुळे नेमका कोण बाजी मारेल, हे सांगणे कठीण झाले आहे.
नात्यागोत्याच्या राजकारणामुळे क्रॉस वोटिंग
महापालिका निवडणूक ही वर वर पाहता पक्षांची लढाई असते; पण प्रत्यक्षात ती घराघरांत, नात्यांत आणि ओळखीत लढली जाते. त्यामुळेच या निवडणुकांत क्रॉस वोटिंगचे प्रमाण इतर निवडणुकांपेक्षा जास्त दिसते. एकाच प्रभागात एकाच कुटुंबातील आणि जवळच्या नात्यातील उमेदवार वेगवेगळ्या पक्षांतून उभे आहेत. प्रचाराच्या काळात मतदार पक्षाच्या झेंड्याखाली फिरत आहेत. पण मतदानाच्या वेळी मात्र “पक्ष नव्हे, आपला माणूस” हे समीकरण चालते. भाऊ, मेहुणा, पुतण्या, जावई, साडू यांच्यापैकी कोणी उमेदवार असेल, तर मतपेटीत बटण तिथेच दाबले जाते. हीच खरी क्रॉस वोटिंगची मुळे आहेत.
महापालिका निवडणुकीतील रिंगणातील उमेदवार
भाजप – ७८
शिंदे सेना – ६२
काँग्रेस – ३१
राष्ट्रवादी अजित पवार – ३२
राष्ट्रवादी शरद पवार – १९
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे – २९
मनसे – ४
वंचित – १२
एमआयएम – ३
समाजवादी पक्ष – ४
रासप – ६
जनसुराज्य पक्ष – ३
बसप – ६
जयहिंद सेना – १
रिपब्लिकन सेना – १
भाकप – १
अपक्ष – ८९.

