खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाध्यक्ष आमदार विनय कोरे यांची प्रचार सभा मिरजेत पार पडली. जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार निवडून दिल्यास, १५ ते २० वर्षांपासून रखडलेली सर्व कामे दीड वर्षाच्या कालावधीत पूर्ण करण्याचे आश्वासन आमदार कोरे यांनी दिले.यावेळी आमदार कोरे म्हणाले की, मिरज शहरातील अनेक मूलभूत प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. वखार भागातील ड्रेनेजचे काम २० वर्षांत पूर्ण झालेले नाही. १५ ते २० वर्षे कामे रखडूनही येथील नगरसेवक पुन्हा निवडणुकीत सहभागी होतात, हे आश्चर्यकारक आहे. मिरजेची जनता शहराची झालेली दुर्दशा किती दिवस सहन करणार? शहराच्या दुरवस्थेला जबाबदार असणाऱ्यांना यावेळी दूर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले की, आरोग्य पंढरी म्हणून ओळख असलेले मिरज शहर आपले वैभव जपण्यात अपयशी ठरले आहे. शहरातील ड्रेनेज व इतर कामे अपूर्ण असतानाही तीच माणसे पुन्हा मते मागण्यासाठी येतात. आपल्या जन्मभूमीची ससेहोलपट किती दिवस पाहणार, असा सवालही त्यांनी केला.प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जनसुराज्य शक्ती पक्ष कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी आमदार अशोकराव माने, डॉ. पंकज म्हेत्रे, महादेव कुरणे, अमर पाटील, संभाजी मेंढे, जयश्री कुरणे, बाळासाहेब कौलापुरे, शांतनू सगरे, डॉ. चंद्रकांत पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
-
मिरजेत औद्योगिक विकास झाला नाही
मिरजेसारख्या शहरात १५ ते २० वर्षे कामे होत नाहीत, हे दुर्दैवी आहे. सत्तेत नसतानाही आपण मिरजेत ३ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी आणला. शहरात कामे रखडवणाऱ्या व्यवस्थेबद्दलची भावना मतपेटीतून व्यक्त करण्याची हीच वेळ असल्याचे त्यांनी सांगितले. मिशन हॉस्पिटल, मिरज दूध डेअरी बंद अवस्थेत असल्याकडे आणि रेल्वे जंक्शन असूनही औद्योगिक विकास होत नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

