खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत वेगवेगळे रंग रोज दिसून येत आहेत. या निवडणुकीत ५० हून अधिक उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. आता आम्ही गुन्हेगारांना निवडून द्यायचे का..? हा प्रश्न मतदारांसमोर असतानाच सांगली शहरातील प्रभाग क्रमांक आठच्या अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी मधील उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
सांगली महापालिका निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार विष्णु माने यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. माने यांनी याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात निलेश गडदे यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार उमेदवार माने हे श्रीहल धेंडे यांच्यासोबत बसले असताना धेंडे यांच्या मोबाईलवरील व्हॉटसअॅपवर गडदे यांनी संवाद साधला. मला माने यांच्याशी बोलायचे आहे असे सांगून माने यांच्याशी संपर्क साधला. यावेळी मोबाईलवरून संवाद साधून तू भाऊ किरण लोखंडे याला तू अडकवले आहेस. तुला व तुझ्या मुलाला मी गोळ्या घालून ठार करेन अशी धमकी दिली.
या तक्रारीवरून संंजयनगर पोलीस ठाण्यात गडदे यांच्याविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

