खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
सांगलीवाडी येथील फल्ले मंगल कार्यालयाजवळ अन्न व औषध विभागाने शुक्रवारी जीपमधून तस्करी केला जाणारा २४ लाख ९० हजार ४४० रूपयांची सुगंधी तंबाखू पानमसाला पकडला.
संशयित विश्वास भारत शिंदे (सध्या रा. अशोका हॉटलमागे मिरज एमआयडीसी, मूळ रा. बेवनूर ता. जत) याला अटक केली आहे. तर संशयित उत्पादक आनंदकुमार परशुराम बालदी, जितेंद्र कुमार प्रजापती, पुरवठादार उमेश पाटील (रा. कुडची), अतुल कश्यप (रा. हुबळी) या चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे पथक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधितगुटखा, सुगंधी तंबाखू, पानमसाला याची तस्करी होणार नाही, यासाठी सज्ज आहेत. शुक्रवारी सायंकाळी अन्न सुरक्षा अधिकारी अशोक इलेगर यांना सुगंधी तंबाखू पानमसाला याची तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सांगलीवाडी येथील मंगल कार्यालयाजवळ पिकअप जीप (एमएच १० सीआर ६४६०) थांबवली. अन्न-औषधचे अधिकारी व कर्मचारी, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. चालक विश्वास शिंदे याला ताब्यात घेतले. पानमसाला व सुगंधी तंबाखू असल्याचे सांगितले. ४१ मोठी पोती, २१ मोठे बॉक्स भरून २४ लाख ९० हजार ४४० रूपयांचा सुगंधी तंबाखू, पानमसाला यांचा साठा आढळून आला. चालक विश्वास शिंदे याला शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली.

